‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या पशूंसाठी दीड कोटींची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशभर मागच्या काही महिन्यात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालक आर्थिक नुकसानीत आहेत. अशा स्थितीत पशुपालकांना शासनाकडून मदत मिळत आहे. सातारा जिल्ह्यात देखील या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. लम्पी स्कीनने जिल्ह्यातील ५९० मृत जनावरांची एक कोटी ५३ लाख ४६ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना येत्या महिनाभरात मदत मिळेल.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लम्पी स्कीनने राज्यातील जळगाव जिल्ह्यात शिरकाव केला. त्यानंतर हळूहळू राज्यभरात या आजाराचा फैलाव वाढत जाऊन जनावरे दगावण्याचे प्रमाणही वाढले. राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे.
त्यानुसार दुधाळ जनावरे ३० हजार, बैल २५ हजार, तर एक वर्षाखालील पशुधनास १६ हजार रुपये मदत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अकरा तालुक्यांतील १९७ बाधित गावांमध्ये ७७७ जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामधील ५९० मृत जनावरांचे अनुदान जमा झाले आहे. उर्वरित १८७ शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच मदत जमा होईल.

‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ अभियान

पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ हे अभियान सुरु केले आहे. गोठा स्वच्छ ठेवल्यास संसर्गजन्य आजारांना आळा बसू शकतो. पशुधन सुरक्षित राहण्यासाठी अभियान मोहीम स्वरूपात चळवळ म्हणून राबविण्यात येईल. या अभियानाची गावोगावी जनजागृती केली जाईल, असे पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

error: Content is protected !!