हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (BBF Sowing Machine) यांनी केंद्रीय कृषि कोरडवाहू संशोधन केंद्र हैदराबाद यांचे चार फणी रूंद सरी वरंबा (4 Tyne BBF Machine) पेरणी यंत्रामध्ये सुधारणा करून पाच फणी रूंद सरी वरंबा (5 Tyne BBF Machine) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी (4 in 1) यंत्र (BBF Sowing Machine) विकसित केले आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन विविध पिकांची लागवड रूंद वरंबा सरी पद्धतीने (BBF Method) केल्यास फायदेशीर ठरते. कोरडवाहू शेतीसाठी उपयोगी तंत्रज्ञानामध्ये रूंद वरंबा सरी पध्दत एक अत्यंत उपयोगी व हवामान बदलानुरुप तंत्रज्ञान ठरले आहे. तसेच तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवण पूर्व तणनाशकांचा वापर करणे फायदेशीर ठरते.
याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (VNMKV, Parbhani) यांनी केंद्रीय कृषि कोरडवाहू संशोधन केंद्र हैदराबाद यांचे चार फणी रूंद सरी वरंबा (BBF) पेरणी यंत्रामध्ये सुधारणा करुन पाच फणी रूंद सरी वरंबा (BBF Sowing Machine) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र विकसित केले.
ट्रॅक्टरने थ्री पॉइंट लींकेजला पेरणी यंत्र (BBF Sowing Machine) लावून पेरणी करत असताना पीटीओ रिकामा असतो, त्याचा वापर करुन फवारणी संच पेरणीसह सुलभतेने वापरता येईल अशी संरचना करण्यात आली आहे.
ट्रॅक्टरचलित पाच फणी पेरणी यंत्रात (BBF Sowing Machine) खालील प्रमाणे थोडा बदल करीत व कमी रुंदीचे टायर लावून, तीन टप्यात सोयाबीन (Soybean Sowing) व इतर पिकामध्ये पेरणी ते फवारणी पर्यंतची संपूर्ण कामे यांत्रिक पद्धतीने करता येते.
1) बीबीएफ पद्धतीने पेरणी, रासणी, फवारणी, उगवण पूर्व (तणनाशक)
- पारंपारिक पद्धतीमध्ये शेतकरी बी, खत, पेरणी, तणनाशक फवारणी व रासणी तसेच कीटकनाशक फवारणीचे कामे ट्रॅक्टर अथवा बैलचलित यंत्राच्या सहाय्याने करतात व त्यासाठी शेतकर्यांना हेक्टरी 30 ते 32 तास लागतात व मजूरावरील व यंत्राचा खर्च जास्त होतो त्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित एकाच फ्रेमवर पाच ओळीचे बीबीएफ (रूंद वरंबा व सरी) पेरणी, रासणी व फवारणी यंत्र (BBF Sowing Machine) विकसीत करण्यात आले आहे.
- यामुळे शेतकर्यांना रूंद वरंब्यावर पेरणी करणे, खत देणे, रासणी करणे व तणनाशक फवारणी करणे हे चारही कामे एकाच वेळी करता येतात त्यामुळे होणारा खर्च कमी होतो व वेळेची बचत होते तसेच शेतात ट्रॅक्टर एकाच वेळी गेल्याने मातीवर दाब कमी पडतो.
यामध्ये असलेल्या सरी यंत्रामुळे (रिजर्समुळे) योग्य प्रकारे वाफे तयार होऊन त्यावर शास्त्रीय पद्धतीने पेरणी होऊन तणनाशक फवारणीमुळे तणाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होतो तसेच वाफ्याची निर्मिती होऊन जर पावसाचे पाणी अधिक पडले ते वाफ्या द्वारे वाहून जाते व कमी पाऊस झाला तर असलेला ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते व पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो.
2) ट्रॅक्टरचलित कोळपणी व सरी यंत्र कमी रुंदीच्या टायरसह
- 4 इन 1 यंत्राचे पेरणीचा डबा काढून याच यंत्रा द्वारे एकाच वेळी कोळपणी गरज असेल तर फवारणी, तसेच सऱ्या मोकळा करणे असे कामे करता येतात. त्याकरिता ट्रॅक्टरला कमी रुंदीचे टायर बसवणे गरजेचे आहे.
- कोळपणी व फवारणी सारखे कामे वेळेवर होणे अत्यंत गरजेचे असते याकरिता आपल्याकडे जे ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरला कमी रुंदीचे टायर बसविणे गरजेचे आहे. ज्यामुळे कोळपणी, फवारणी ही कामे यांत्रिक पद्धतीने वेळेवर आटोपता येतात. कमी रुंदीची टायर खरेदी करताना ट्रॅक्टरला बसेल असेच टायर रीमसह खरेदी करावे.
3) ट्रॅक्टरचलित फवारणी
या यंत्रा द्वारे कीटकनाशक तसेच उगवणी पूर्व व नंतर तणनाशक फवारणी करता येते. फवारणी करते वेळी पेरणी यंत्र बाजूला काढून ठेवता येते व पाहिजे ते कीटकनाशक फवारणी करता येते. या यंत्राने एक सारखी फवारणी करता येते. फवारणी यंत्राच्या 6 मीटर बुम वर 12 नोझल असून ते पिकातील दोन ओळीतील अंतरानुसार कमी अधिक अंतरावर बसविता येतात. या यंत्राच्या सहाय्याने तासाला 1 हे. क्षेत्र फवारणी होते.
पाच फणी बीबीएफ यंत्राचे प्रमुख फायदे (BBF Sowing Machine)
- फणीतील अंतर बदलणे सहज शक्य
- वाफे पद्धतीचा वापर
- पेरणीसह रासणी व तणनाशक फवारणी
- खर्चात व वेळेत 30-40% बचत.
- कार्यक्षमता 1.5 एकर प्रति तास
- गादी तयार करणे, खत व बी पेरणीसह रासणी व फवारणी एकाच वेळेस केल्यामुळे शेतातील माती दाबण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे माती मोकळी राहण्यास मदत होते.
- उत्पन्नात 20 ते 30% वाढ
- बी व खतामध्ये 15-20% बचत.
- तण काढणे व खर्चात 20% बचत.
- कोळपणी, फवारणी व सऱ्या मोकळा करण्याचे दुसर्या टप्यातील काम एकाच वेळेत करता येतात
- फक्त फवारणी करिता सुद्धा वापरता येते
शेतकर्यांनी यंत्राच्या (BBF Sowing Machine) अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
डॉ. एस. एन. सोलंकी (संशोधन अभियंता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
संपर्क क्रमांक – 8007752526