Pre Monsoon Rain: मान्सूनपूर्व पाऊस का असतो महत्वाचा ? राज्यात मान्सूनपूर्व पावसात 73 टक्के घट…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी उन्हाळा अतिशय कडक राहिला . केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या अनेक भागातील तापमान ४२ अंशांच्या वर पोहचले होते. आता मान्सून आंदामांत दाखल झाला आहे. लवकरच तो केरळ आणि राज्यासहदेशातील इतर भागही व्यापून टाकेल. आताकुठे देशात मान्सूनपूर्व (Pre Monsoon Rain)पाऊस हजेरी लावू लागला आहे. या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी वादळी पावसामुळे नुकसानच झाले आहे. संपूर्ण देशाचा विचार केला असता देशामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशातल्या १२ राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे तर महाराष्ट्राचा विचार करता मार्च ते 17 मे पर्यंत सरासरीच्या 73 टक्के मान्सूनपूर्व पाऊस कमी झाल्याची नोंद झाली आहे.

मान्सूनपूर्व पाऊस का महत्वाचा ?

मान्सूनपूर्व (Pre Monsoon Rain) पाऊस पुरेसा झाला तर खरीप पिकांना मोठा आधार मिळत असतो. शेतीची कामं सुरु करण्यास बळीराजा सुरुवात करत असतो. मात्र, सरासरीपेक्षा मान्सूनपूर्व पाऊस कमी झाला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे भाजीपाला आणि इतर पिकांना देखील दिलासा मिळत असतो. मात्र पाऊस कमी झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादन घातल्यामुळे भाजीपाला महाग होण्याची शक्यता जास्त असते. विशिष्ट मोसमात भारताच्या नैर्ऋत्य दिशेकडून येऊन भारताला धडकणाऱ्या आणि सोबत भरपूर पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून म्हणतात.

मान्सूनसाठी अनुकूल वातावरण

दोनच दिवसांपूर्वी अंदमानात पोहोचलेल्या मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार आहे. यावर्षी नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशातील पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांत काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होतोय. तसेच महाराष्ट्रातही काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. (Pre Monsoon Rain)

12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होणार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस हे पावसाचे असणार आहेत. यात कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून सुरु होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!