सोलापूरच्या शेतकऱ्याने जुगाड करीत स्वत:च बनवले फवारणी यंत्र ; काय आहे ‘नंदी ब्लोअर’ ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये आता नवनवीन तंत्रज्ञान येऊ घातले आहे. ज्या कामासाठी मनुष्यबळाचा वापर व्हायचा तीच शेतीची कामं आता कमी वेळेत यंत्राच्या साहाय्याने केली जातात. मात्र अद्यापही शेतीची आधुनिक यंत्रे सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या बजेटच्या बाहेर आहेत. मात्र काही शेतकरी असे असतात की जे स्वतःचीच कल्पना लढवून समस्येवर मात करतात. सोलापुरातल्या एका शेतकऱ्याने असाच जुगाड करून द्राक्षबागेसाठी स्वात:च फवारणी यंत्र तयार केले आहे. चला जाणून घेऊया शेतकऱ्याच्या या जुगाडाबद्दल…

सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातल्या खुनेश्वर गावातल्या एका शेतकऱ्याने हे भारी जुगाड बनवले आहे. ज्ञानेश्वर हरीदास चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पीक फवारणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री न घेता त्यांनी 40 ‘नंदी ब्लोअर’ नावाचे यंत्र तयार केले असून याद्वारेच आता द्राक्षासह इतर पिकांची ते फवारणी करीत आहे. ज्ञानेश्वर हरीदास चव्हाण यांनी दोन वर्षापूर्वी दोन एकर द्राक्षे लागवड केली होती. मात्र द्राक्ष बाग फवारणीसाठी मजूरांमार्फत मोठा खर्च होत होता. सोबतच वेळ ही जास्त लागत होता. त्यामुळे त्यांनी हा जुगाड करण्याचे ठरवले.

असा बनला 40 ‘नंदी ब्लोअर’

हे फवारणी यंत्र बनवण्यासाठी त्यांनी मोटारसायकलच्या जुन्या चाकांचा वापर आणि लोखंडी अँगलचा वापर करीत केवळ पाच हजारात गाडा तयार केला. पीक फवारणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्र सामुग्री चव्हाण यांनी बैलगाडीत बसवलेली आहे.पाठीमागील बाजुस एसटीपी पंप बसवला आहे. त्यापुढे 5 एचपीचे डिझेल इंजिन आणि दोनशे लिटर क्षमतेचा आडवा बॅरल ठेवला आहे. त्यामध्ये 20 एमएम ड्रीपच्या नळ्यांचा वापर केला. बाजारातून खरेदीकरुन फवारणीसाठी दोन्ही बाजुला चार-चार स्प्रे गन बसवले. सर्वात पुढे एक बैल जुंपता यावा अशी व्यवस्था केली. अशा प्रकारे तयार झाला 40 ‘नंदी ब्लोअर’

40 हजार रुपयांचा आला खर्च

खरे तर फवारणी यंत्र तयार करण्यासाठी 6 ते 7 लाख रुपयांचा खर्च करणे शक्य नसल्याने त्यांनी हा जुगाड करण्याचे ठरवले. त्यांना हे यंत्र बनवण्यासाठी 40 हजार रुपयांचा खर्च आला. चव्हाण यांनी केलेला प्रयोग हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. आता मनुष्यबळाने शेती कामे उरकणे शक्य नाही. तर दुसरीकडे आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शेतकरी हा असे प्रयोग करीत आहे. त्यामुळे ‘नंदी ब्लोअर’चा प्रयोग हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!