राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कशी घ्याल पिकांची काळजी ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 11 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीसाऱ्यासह मुसळधार पावसाची तर जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्यवस्थापन

१) कापूस

कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

२) सोयाबीन

पुढील दोन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची स्वच्छ हवामानात काढणी करावी.

३)तूर

तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. शक्य असेल तेथे तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

४) खरीप भुईमूग

काढणीस तयार असलेल्या खरीप भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

५) मका

मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

६) रब्बी ज्वारी

रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

७) रब्बी सूर्यफूल

रब्बी सुर्यफुलाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. पेरणी संकरीत वाणासाठी 60X30 सेंमी तर सुधारित वाणासाठी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.

error: Content is protected !!