हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात ठिकठिकाणी फार मोठा बदल होताना दिसतोय. शेतीत वेगवेगळे प्रयोगशील बदल होताना दिसतात. अशातच आता मावळ तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने गोशाळा उभारली. यातून तो महिन्याला १० लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. आजच्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे असे त्यांनी तरुणांना आपल्या कामगिरीतून आवाहन केलं आहे.
मावळ तालुक्यातील ऋषिकेश सावंत हा पदवी मिळवलेल्या तरुणाने सुरुवातीला वडिलोपार्जित २ गायी पाळल्या होत्या. तेव्हा पासून ते आतापर्यंत एकूण ४०० गायींचे ऋषिकेशने पालन करून गोशाळा उभारली. सुरुवातीला त्याने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. याच गोशाळेत गीर, थरपारकर, साईवाल, खिल्लार, राठी, अशा ५ प्रकारच्या जातीच्या गाई आहेत.
ऋषिकेश हा पहाटे ३ दरम्यान उठतो. गायांचे शेण काढतो. त्यानंतर गायींना अंघोळ घालतो. तसेच या ठिकाणी जंतू पसरू नये म्हणून एका ड्रममध्ये कडुलिंबाचा पाला, कापूर, गोवार टाकून निर्जंतुक धूर केला जातो. जेणेकरून गायींना माशा लागून आजारी पडू नये. तसेच गायीच्या आहारात उसाची कुट्टी, सरकी ढेप दिली जाते. मात्र गाईचे दुघ वाढवण्यासाठी गव्हाचा भरडा,मका भरडा,हे सर्व शिजवून तयार करून दिलं जातं.
त्यानंतर धारा काढायला सुरुवात होते. दररोज एकूण ६०० लिटरचे एकूण दूध उत्पादन होते. यातून महिन्याला १० लाख रूपये कामाई होते. त्यातून चारा,कामगारांचा पगार, औषध हा सर्व खर्च वगळता ६ ते ७ लाख रुपये नफा होतो. अशातच आता ऋषिकेशचे वडील शांताराम सावंत यांनी तरुण आणि शेती व्यवसाय याबाबत माहिती दिली आहे.
काय म्हणाले वडील शांताराम सावंत?
शांताराम सावंत म्हणाले की, “आजकाल मुलं उच्चशिक्षित होऊन नोकरीच्या मागे धावतात. मात्र त्यातील एकही उच्चशिक्षित मुलगा मला शेतकरी व्हायचं आहे. मला गाई पाळायची आहे, असं कोणीही म्हणत नाही. असंख्य पदव्या घेतलेले युवक नोकरीसाठी फिरत आहेत. त्यापेक्षा आपली वडिलोपार्जित शेती केली किंवा शेळीपालन, गोपालन, असा व्यवसाय केला तर नक्कीच नोकरीपेक्षा व्यवसाय बरा असं म्हटल्याशिवाय राहणार नाही.