सोलापुरातील सिव्हिल इंजिनिअर तरुणाने पिकवली लाल केळींची बाग ; इतर शेतकऱ्यांसाठी ठरतोय रोल मॉडेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : रेड बनाना म्हणजेच लाल केळी म्हंटल की कर्नाटक तामिळनाडू राज्यांची आठवण येते कारण या राज्यांमध्ये अशा केळींचे उत्पादन घेतले जाते. मात्र लाल केळीच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग सोलापुरात साकारला आहे. सोलापुरातील करमाळा येथील अभिजित पाटील या सिव्हिल इंजिनिअर असलेल्या तरुणाने लाल केळीची लागवड केली असून सध्या तो यातून चांगला नफा कमावतो आहे.

उजनी जलाशयाच्या काठावर अभिजीत पाटील याची शेती असून पूर्वापार इथे ऊसाचे पीक घेतले जात होते. मात्र ऊसासोबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. अभिजितच्या वडिलांनी 2005 मध्ये पहिल्यांदा या भागात G9 या नेहमीच्या केळीची लागवड केली. पुढे या केळींचे कधी दर २० रुपये तर कधी थेट 2 रुपये असे बदलत असल्याने कधी फायदा तर कधी तोटा होऊ लागला होता. यानंतर अभिजीतने पहिल्यांदा 2015 साली वेलची केळी लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याने 7 एकरवर लागवड केली. गीर गायीचे शेण, गोमूत्र आणि ऊसाच्या मळीची स्लरी देत त्याने याची जोपासना केली. दहाव्या महिन्यात अभिजीतला एकरी 12 ते 15 टन इलायची केळीचे 50 रुपये किलोप्रमाणे लाखोंचे उत्पन्न मिळाले.

सेंद्रिय पद्धतीने लागवड

त्यानंतर एका ठिकाणी विक्रीस आणलेली लाल केली पहिली याला सुपर मार्केटमध्ये प्रतिकिलो १२० रुपयांचा दर मिळत असल्यामुळे या केळीची लागवड करण्याचे ठरविले. त्यानुसार 2019 मध्ये अभिजीतने शेतात 3 एकरावर पहिल्यांदाच लाल केळीची लागवड केली. रासायनिक खते आणि औषधांना फाटा देत संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने जोपासना केल्याने 14 महिन्यात एकरी 18 ते 20 टन एवढा माल मिळाला. या केळींना देखील प्रतिकिलो 50 ते 75 प्रमाणे भाव मिळत असल्याने महाराष्ट्रात केलेला हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाले. लाल केळीची झाडे 15 ते 20 फुटांपर्यंत वाढत जातात. त्यामुळे सुरुवातीला अभिजीतलाही हे थोडे त्रासदायक वाटले. शिवाय या केळीच्या झाडाला मोठ्या प्रमाणात पिल्ले येत असल्याने बाकीची पिल्ले वेळीच तोडण्याची खबरदारी घ्यावी लागल्याचे अभिजीतच्या वडील बाळासाहेब पाटील सांगतात. सध्या अभिजीतचे पाहून वाशिंबे परिसरात 500 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर ही वेलची केळी आणि रेड बनाना लागवड झाली असून आता हे वाशिंबे वेलची केळी आणि रेड बनानाचे हब बनू लागले आहे. विशेष म्हणजे हि केळी पाहण्यासाठी सध्या जळगाव, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील विविध भागातून शेतकरी येत असून जवळपास 70 लाख बेण्यांची विक्री झाल्याचे बाळासाहेब पाटील सांगतात .

इतर शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल

याबरोबर अभिजित आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या शेतात इतरही फळांची लागवड करतात गोल्डन सीताफळ, व्हाईट आणि रेड ड्रॅगन फ्रुट अशा फळांची लागवड देखील त्याने आपल्या शेतात केली आहे. सध्या अभिजीत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल बनला असून राज्यभरातून रोज शेकडो शेतकरी त्याची शेती पाहण्यासाठी येत असतात. आजही अभिजित रेड बनाना असो वेलची केळी असो अथवा गोल्डन सीताफळ असो या सर्वांचे पॅकिंग करुन फळांची विक्री करतो. त्याला यातून चांगला फायदा होत आहे.

स्रोत : एबीपी माझा

error: Content is protected !!