Agricultural Service Centre : अनेक तरुण वर्ग कृषी विषयाचे शिक्षण घेऊन कृषी सेवा केंद्राकडे एक व्यवसायाचे साधन म्हणून पाहत असतो. बऱ्याच जणांच्या डोक्यात विचार असतो की कृषी विषयाचे शिक्षण घ्यायचं आणि कृषी सेवा केंद्र दुकान टाकायचे. कृषी सेवा केंद्रामधून खते, बियाणे त्याचबरोबर कीटकनाशकांची विक्री करता येते. मात्र यासाठी तुम्हाला कृषी विभागाकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो. आता हा रीतसर परवाना घेण्याची नेमकी प्रक्रिया काय असते? त्याचबरोबर कृषी केंद्र सेवा केंद्राचा परवाना कशामुळे रद्द होऊ शकतो? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा (Agricultural Service Centre application)
कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी कृषी पदविका त्याचबरोबर कृषी विज्ञान विषयात पदवी प्राप्त असणारे तरुण-तरुणी यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आपले सरकार या पोर्टल वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करायची आहे. मग कृषी विभाग निवडून कृषी परवाना सेवा या ऑप्शन वर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही बियाणे, कीटकनाशके त्याचबरोबर रासायनिक खते यांच्या विक्रीसाठीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी किती फी लागते?
तुम्हाला नेमका कशासाठी परवाना पाहिजे यानुसार ती फी आकारली जाते जर तुम्हाला कीटकनाशकासाठी परवाना पाहिजे असेल तर 7500 रुपये फी आकारली जाईल. बियाणांसाठी विक्रीचा परवाना पाहिजे असेल तर 1000 रुपये फी आकारली जाईल त्याचबरोबर रासायनिक खते विक्रीचा परवाना पाहिजे असेल तर 450 रुपये फी आकारली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज भरताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी दुकान टाकायचे आहे त्यात जागेचा गाव नमुना 8 त्याचबरोबर. ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र, त्याचबरोबर जर तुम्ही कृषी सेवा केंद्र उभारण्याची जागा भाडेतत्त्वावर असेल तर भाडे पट्ट्याचा करार, त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र असे अनेक आवश्यक कागदपत्रे तुम्हाला यासाठी गरजेचे आहेत. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला परवाना मिळू शकतो.
अर्ज केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असते?
तुम्ही एकदा अचूक पद्धतीने जर अर्ज केला तर त्यानंतर जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांच्याकडे तो अर्ज जातो. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर कृषी उपसंचालक यांच्या टेबलावर तो अर्ज जातो त्यानंतर कृषी उपसंचालकाने यासाठी मंजुरी दिली की तो अंतिम मंजुरीसाठी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्याकडे जातो त्यानंतर तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी जवळपास एक महिना कालावधी लागतो.
तुमचा कृषी केंद्राचा परवाना कधी रद्द होतो?
कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचं दर पाच वर्षांनी नूतनीकरण करणं गरजेचं असतं त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कृषी सेवा केंद्रातून बेकायदेशीर रित्या खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करत असल्यास तुमचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला बियाणांची खतांची विक्री करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे
कृषी सेवा केंद्रातून किती कमाई होते?
कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की त्यामधून नफा मिळावा अशी अपेक्षा प्रत्येकांना असते. अगदी खूप छोटा व्यवसाय केला तरी त्यामधून चांगला नफा मिळावा असे अनेकांची अपेक्षा असते. यामध्ये कृषी सेवा केंद्राचा विचार केल्यास कीटकनाशक विक्रीतून सात ते तेरा टक्के खतांच्या विक्रीतून तीन ते सात टक्के बियाणांच्या विक्रीमधून दहा ते अकरा टक्के एवढा नफा साधारणत राहू शकतो असं कृषी सेवा केंद्र चालकांच्या बोलण्यातून समोर आले आहे.