हॅलो कृषी ऑनलाईन : सिल्लोड तालुक्यात अंधारी गावात ६५ मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्या आहेत. १०० मेंढ्या अस्वस्थ असून ॲपल बोर खाल्ल्याने ६५ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड तसेच छत्रपती संभाजीनगर प्रयोग शाळा विभागीय रोग अन्वेषण डॉ. रोहित घुमाळ, सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी भेट देत मेंढ्यापालन करणाऱ्या मेंढपाळांची भेट घेऊन पाहणी केली.

जनावरांची खरेदी विक्री online करण्यासाठी इथे क्लिक करा
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील कासारी येथे काही मेंढपाळ मेंढी चराईसाठी सिल्लोडच्या अंधारी शिवारात आपल्या २०० मेंढ्या घेऊन आले होते. अशावेळी मेंढ्या चराई करत असताना ॲपल बोर खाल्ल्याने काही मेंढ्या मृत्युमुखी पडून जमिनीवर कोसळू लागल्या. या झालेल्या प्रकारामुळे इतर सर्व मेंढपाळ घाबरले आहेत. ग्रामस्थांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अंधारी येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी उपचारास सुरुवात केली मात्र डॉक्टरांनी उपचार करेपर्यंत किमान सहा वाजेपर्यंत ५० मेंढ्यांचा मृत्यू झाला.
रात्री ९ वाजेपर्यंत मेंढ्यांच्या मृत्यूची संख्या ६५ हून अधिक पहायला मिळाली. यामुळे मेंढपाळांचे खूपच नुकसान झालं आहे. सिल्लोडचे तहसीलदार विक्रम रजपूत, गटविकास दादासाहेब अहिरे, मंडळ अधिकारी गजेंद्र चांदे तसेच तलाठी ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी या ठिकाणी येऊन घटनेचा सर्व पंचनामा केला.