हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या मार्च महिन्यातील पंधरावड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातलं होतं. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बळीराजा हवालदील झाल्याने शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती पहायला मिळते. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करण्यासाठी सरकारकडे मागणी केली, परंतु सरकारी नोकरदारांनी संप ( Government Employee On Strike) पुकारल्याने शेतीचे पंचनामे करण्यासाठी उशीर झाला. परंतु आता मराठवाड्यातील ९९ टक्के शेतीच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अपेक्षा धरली आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा
मराठवाड्यात शेतीच्या पंचनाम्याचे काम आता पूर्ण झाले आहे. या पंचनाम्यात मराठवाड्यातील ११ लाख ७ हजार ५ शेतकऱ्यांचे एकूण ६० हजार २५८ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. म्हणून आता शेतकरी नुकसान भरपाईची प्रतीक्षा करू लागले आहेत. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने चार महिने लावले होते. मात्र आता या पीक नुकसान भरपाईसाठी किती कालावधी लागेल. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठवाड्यातील पंचनामे आकडेवारी खालीलप्रमाणे :
छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात एकूण 31 हजार 455 शेतकऱ्यांच्या पिकांना बाधा झाली आहे. तर 13 हजार 951 हेक्टर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून 95.08 टक्के शेतीचे पंचनामे पूर्ण झाले.
जालना जिल्ह्यात 4 हजार 215 शेतकऱ्यांच्या पिकांना बाधा झाली असून 1 हजार 969 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. जालना जिल्ह्याचे 100 टक्के पंचनामे पूर्ण झाले.
परभणीत 5 हजार 999 शेतकऱ्यांचे पीक बाधित झाले असून या जिल्ह्यातील 3 हजार 960 हेक्टर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या जिल्ह्याचे 100 टक्के पंचनामे झाले.
हिंगोली जिल्ह्यात 6 हजार 526 शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. तर 3 हजार 838 हेक्टर एवढ्या शेतीचे नुकसान झाले असून 100 टक्के पंचनामे हिंगोली जिल्ह्यात झाले.
नांदेड या जिल्ह्यात 36 हजार 543 शेतकऱ्यांच्या पिकांना बाधा झाली. तसेच 21 हजार 579 हेक्टर नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून 100 टक्के शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
बीड जिल्ह्यात 7 हजार 850 शेतकऱ्यांच्या पिकांना बाधा झाली असून 3 हजार 802 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या जिल्ह्यातही 100 टक्के पंचनामे झाले. लातूर जिल्ह्यात 22 हजार 565 शेतकऱ्यांचे पीक बांधीत झाले आणि 10 हजार 367 हेक्टर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या जिल्ह्याचे 100 टक्के पंचनामे पूर्ण झाले.
धाराशिव जिल्ह्यातील 2 हजार 652 शेतकऱ्यांच्या पिकांना बांधा झाली आणि 1 हजार 349 पिकांचे नुकसान झाले. या जिल्ह्यात एकूण 100 टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण झाले.