हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्रांतीचे जनक आणि देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख (Agrotech Exhibition) यांच्या 125 व्या जयंती दिनानिमित्त अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 27 ते 29 डिसेंबर या काळात तीन दिवसीय राज्यस्तरीय ‘ॲग्रोटेक’ कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राज्य सरकारचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या समन्वयातून होत असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (ता. 27) होणार आहे. प्रदर्शन, कृषी महोत्सव व विविध विषयांवरील चर्चासत्रेही यावेळी आयोजित करण्यात आली आहे. सुमारे चारशेपेक्षा अधिक दालने या प्रदर्शनात (Agrotech Exhibition) असणार आहेत.
ही दालने असतील (Agrotech Exhibition In Akola Agriculture University)
राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान, राज्य सरकारचा कृषी विभाग, जैविक शेती मिशनसह विविध राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित संस्था, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, यंत्र अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, बी-बियाणे खते, कीटकनाशके, सेंद्रिय निविष्ठा उत्पादक कंपन्या यासह कृषी विद्यापीठातून शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या आणि स्वतः उद्योजक म्हणून सेवारत असणाऱ्या कृषी पदवीधरांची दालने, विदर्भातील स्वंयसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून निर्मित कृषी पूरक उत्पादने, व खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील या प्रदर्शनाचे आकर्षण बिंदू ठरणार आहे.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन या निमित्ताने बघावयास मिळणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे -अवजारे, पीक संरक्षणाच्या विविध पद्धती, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या अनेकानेक जाती, फळे- फुले, रानभाज्यांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरणार आहे. प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे कृषी प्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.