डंख मरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव ? कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आळीच्या डंखाने शेतकऱ्याला दवाखान्यात भरती करण्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिराळा परिसरात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यातच समाज माध्यमांवर या अळीबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या. या आळीचा पिकांसाठी धोकादायक आहे का ? अळीने डंख केल्यास काय काळजी घ्यावी ? यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कार्यरत असलेले कीटक शास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे व डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी पुढील माहिती दिली आहे.

या आळीला इंग्रजीमध्ये ‘स्लज कॅटरपिलर’ असे म्हणतात. ही एक बहुभक्षी कीड आहे. बांधावरील गवतावर, एरंडी,आंब्याच्या झाडावर, चहा , कॉफी यासारखे पिके व इतर फळ पिकावर तुरळ ठिकाणी एखादी आळी दिसून येत असते. असे असले तरी एखाद्या परिसरामध्ये ही कीड जास्त प्रमाणात आल्यास अधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवल्याचे देखील उदाहरणे आहेत. पावसाळ्यात, पावसाळ्याच्या शेवटी, उष्ण व आर्द्र हवामानात ही अळी दिसून येते. या आळीच्या अंगावर बारीक बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात व या केसातून ते विशिष्ट रसायन किंवा विष त्यांच्या स्वसंरक्षणासाठी बाहेर टाकतात. हे रसायन त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवर चट्टे पडून अग्नी दाह होतो. ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही.

गांधींल माशीने डंक केल्यावर दाह होतो, केसाळ आळी यांच्या संपर्कातून एलर्जी होते. त्याचप्रमाणे स्लज कॅटरपिलर या आळीच्या संपर्कात त्वचा आल्यासच अग्नी दहा होत असतो, तो शक्यतो सौम्य असतो. पण ज्या व्यक्तींना ऍलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे, त्या व्यक्तीमध्ये मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे पहावयाला मिळू शकतात.

काय घ्यावी काळजी ?

— बांधावरील गवत काढत असताना किंवा शेतातील इतर कामे करत असताना या किडीचे निरीक्षण करून ही कीड आपल्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.

–त्याचप्रमाणे काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्या त्वचेशी या किडीचा किंवा तिच्या केसाचा संपर्क आल्यास आपण घरी वापरतो तो चिकट टेप हा दंश झाल्याच्या ठिकाणी हलक्या हाताने लावून काढून घ्यावा. त्यामुळे या अळीचे केस सहजपणे निघून जाऊन दाह कमी होण्यास मदत होते.

— त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावणे व काही प्रमाणात बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावणे हे देखील फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. पण लक्षणे तीव्र असल्यास मात्र नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे योग्य राहील.

या किडीच्या नियंत्रणासाठी विशिष्ट अशा रसायनाची किंवा कीटकनाशकाची शिफारस नसली तरी नेहमीच्या वापरातील कीटकनाशक जसे की, क्लोरोपायरीफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी),प्रोफेनोफोस (२० मिली प्रती १० लि. पाणी) ,क्वीनॉलफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (४ ग्रॅम प्रती १० लि. पाणी ), ५ टक्के निमार्क हे उपयुक्त ठरू शकतात. अशी माहिती आंबेजोगाई जिल्हा बीड विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र डॉ. व्ही. पी. सूर्यवशी यांनी दिली.

 

Leave a Comment

error: Content is protected !!