हॅलो कृषी ऑनलाईन: हिवाळा हा ऋतू पशुधनासाठी (Animal Care In Winter Season) आरोग्यदायी असला तरी सध्या राज्यात दिवसा उन्ह आणि रात्रीच्या वेळी थंडी असे विषम वातावरण आहे. लहान करडे, कोकरे, वासरे यांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायला आलेल्या जनावरांची (Pregnant Animal Care) काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या विषयी महत्वाची माहिती.
हिवाळ्यात जनावरांची काळजी (Animal Care In Winter Season)
- जनावरांच्या गोठ्यांना बारदान किंवा शेडनेटचे पडदे लावावेत.
- गोठ्यामध्ये उष्णता टिकून राहण्यासाठी 500 ते 1000 वॅटचे बल्ब गोठ्यामध्ये कमी उंचीवर लावावेत. शक्य झाल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी.
- गाभण जनावरांना व छोटय़ा जनावरांना रात्रीच्या वेळी वाळलेले गवत/ कडबा/ गोणपाट यांची बिछायत टाकावी.
- गोठा कोरडा राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी, यासाठी दर 8 ते 10 दिवसांनी गोठ्यामध्ये चुना भुरभुरावा.
- थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जनावरांच्या अंगावर गोणपाट बांधावे. विशेषतः: गाभण गायी म्हशींची जास्त काळजी घ्यावी (Animal Care In Winter Season).
- जनावरांना जास्तीत जास्त उर्जा मिळवण्यासाठी जनावरांच्या आहारात (Animal Fodder) शेंगदाणा पेंड, सरळी पेंड यांचा वापर करावा. शक्य असल्यास बायपास फॅट व प्रथिनेयुक्त आहार द्यावा. क्षार व जीवनसत्वांचे मिश्रण वाढवावे. सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा.
- चराऊ जनावरांना चरायला नेताना सकाळी उशिरा न्यावे जेणेकरून गवतावर दव नसेल. गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत.
- सर्दीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जनावरांच्या नाकाभोवती टर्पेन्टाइनचा बोळा फिरवावा. सर्दीचा रंग हिरवट पिवळसर असल्यास तातडीने पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
- जनावरांचे पिण्याचे पाणी अति थंड नसावे.
- जनावरे धुवायची झाल्यास शक्यतो दुपारच्या वेळी धुवावीत.
- जनावरांना लाळ्या – खुरकुत आजारापासून संरक्षणासाठी लसीकरण (Animal Vaccination) करावे (Animal Care In Winter Season).