Animal Husbandry : जनावरांमध्ये हिवाळ्यात लाळ्या-खुरकुत हा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या रोगामुळे जनावरांच्या तोंडामध्ये व खुरांमध्ये जखमा होतात. त्यामुळे जनावरांना चारा खाता येत नाही. या रोगामुळे दुभत्या जनावरांच्या दुधामध्ये घट होते. जनावरे वेळेवर माजावर येत नाहीत, तसेच गाभण जनावरांमध्ये गर्भपाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे या आजाराचे नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी काही घरगुती उपायही करता येऊ शकतात.
आवश्यक साहित्य/सामग्री
कुप्पी (हरित मंजरी) वनस्पतीची पाने 1 मूठभर, लसणाच्या पाकळ्या 10, कडूनिंबाची पाने 1 मूठभर, नारळाचे तेल किंवा तिळाचे तेल 500 मि.ली., हळद पावडर 20 ग्रॅम, मेहंदीची पाने 1 मूठभर, तुळशीची पाने 1 मूठभर, सीताफळाची पाने.
कृती
नारळाचे तेल किंवा तिळाचे तेल आणि सीताफळाची पाने सोडून इतर सर्व सामग्री एकत्र बारीक वाटून घ्यावी. यामध्ये नारळाचे किंवा तिळाचे तेल टाकून चांगले उकळावे आणि थंड करावे.
याचा वापर कसा करावा?
सर्वात आधी जखमा स्वच्छ कराव्यात. त्यानंतर हे मिश्रण जखमेवर लावावे. जखमेत किडे असतील तर पहिल्या दिवशी नारळाच्या तेलात कापूर मिसळून जखमेवर लावावे किंवा सीताफळाच्या पानांची पेस्ट करून जखमेवर लावावी. याबरोबर रोगाची तीव्रता जास्त असल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.
लसीकरण महत्त्वाचे
लाळ्या-खुरकुत या रोगापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. लसीकरण केल्यानंतर 15 दिवसानंतर रोगाविरूद्ध प्रतिकार शक्ती तयार होण्यास सुरुवात होते. लसीकरण केल्यानंतर सहा महिन्यापर्यंत जनावरांची या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती टिकून राहते. त्यामुळे वर्षातून दोनदा जनावरांचा या रोगाचे लसीकरण करावे.