Bajari Lagwad : बाजरी हे पीक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. मात्र खरीप बाजरीचे पीक हे फायदेशीर ठरते. हे पीक पाण्याचा ताण सहन करणारे कमी पाण्यावर येणारे पीक आहे. तसेच धान्याबरोबरच जनावरांना चारा देणारे पीक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य होते. पाऊस उशिरा किंवा कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा हे पीक अधिक धान्य व चारा उत्पादन देते.
रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
जमिनीची निवड कशी करावी?
खरीप बाजरी पिकासाठी हलकी ते मध्यम जमीन असणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन बाजरी पिकासाठी चांगली समजली जाते. हलक्या जमिनीत हे पीक घ्यायचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.
पेरणी कधी करावी (Bajari Lagwad Mahiti
बाजरी हे कमी दिवसाचे म्हणजेच दोन ते अडीच महिन्याचे पीक आहे. त्यामुळे लवकर निघते. बाजरी पिकाची पेरणी 15 जून ते 15 जुलै या दरम्यान करावी. बाजरीची लागवड लवकर केल्यास रब्बी पिक घेता येते.
महत्त्वाचे वाण कोणते आहेत?
फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती, श्रद्धा, सबुरी या संकरित जाती तसेच धनशक्ती ही सुधारित जात बाजरीसाठी निवडावी. बियाण्याचे प्रमाण बाजरी लागवडीसाठी पेरणीसाठी हेक्टरी तीन ते चार किलो बियाणे वापरावे.
पेरणी कशी करावी?
पेरणी दोन ते तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर करणे टाळावे किंवा करू नये. बी जास्त खोलवर पडल्यास उगवण होत नाही. कोरडवाहू बाजरी 45 × 15 सें.मी. अंतरावर तर पाण्याची सोय असल्यास बागायती बाजरी 30 × 15 सें.मी. अंतरावर पेरणी करावी
खत व्यवस्थापन कसे करावे?
हलक्या जमिनीसाठी 40 कि.ग्रॅ. नत्र, 20 कि.ग्रॅ. स्फुरद, 20 कि.ग्रॅ. पालाश तर मध्यम जमिनीत 50 कि.ग्रॅ. नत्र, 25 कि.ग्रॅ. स्फुरद व 25 कि.ग्रॅ. पालाश प्रति हेक्टरी द्यावे. पेरणीच्या वेळी नत्राचा अर्धा हप्ता आणि स्फुरद व पालाश पूर्ण द्यावे तर पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा अर्धा हप्ता जमिनीत ओला असताना द्यावा. पिकाच्या अधिक उत्पादनासाठी दहा किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी पूर्वमशागतीच्या वेळेस जमिनीतून द्यावे. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास पिकास कॅल्शिअम व सल्फर ही अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्येही मिळतात. (माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत.)
रोग नियंत्रण
केवडा किंवा गोसावी
१. पीक २० ते २१ दिवसांचे झाल्यावर रोगट झाडे उपटून टाकावी.
२. पेरणीनंतर १४ दिवसांनी पिकावर कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के हेक्टरी १ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी किंवा मेटॅलॅक्झील एम. झेड ७२ पावडर ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २० दिवसांनी फवारावे.
३. गोसावी किंवा केवडा रोगग्रस्त शेतात पुन्हा बाजरी घेऊ नये. ४. रोगास बळी न पडणारे वाण वापरावेत.
अरगट
१. २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी.
२. कणसे बाहेर पडण्यापूवी थायरम (०.१० ते ०.१५ टक्के) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड थायरम (२:१) ५०० ते ६०० ग्रॅम या प्रमाणात दोन ते तीन वेळा फवारणी करावी.
३. उशीरा पेरणी करू नये, रोगट झाडे उपटुन नष्ट करावीत.
४. खोल नांगरट व पिकाची फेरपालट करावी.
कीड नियंत्रण
सोसे अथवा हिंगे
सकाळच्या वेळी वारा शांत असतांना कणसावर मिथिल पॅराथिऑन (फॉलीडॉल) २ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो याप्रमाणात धुरळावी. ४) खोड किडी किंवा खोड माशी मेलॉथिऑन ५० टक्के प्रवाही १४ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
लष्करी अळी किंवा केसाळ अळी
थिल पॅराथिऑन (फॉलीडॉल) २ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो धुरळावी.
आंतरमशागत व तण व्यवस्थापन कसे करावे?
चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर डवरणी करावी जेणेकरून जमिनीच्या भेगा बुजतील व मातीमध्ये ओलावा टिकून राहील. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. गरजेनुसार बाजरी पिकात तणनाशकांचा वापर करता येतो. यासाठी ऍट्राझीन किंवा सिमाझीन हे उगवणपूर्व (पेरणीनंतर परंतु बी उगवण्यापूर्वी) तणनाशक हेक्टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावे. फवारणी नंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. तसेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 2,4-डी (फक्त सोडिअम साल्ट) हे उगवणनंतर तणनाशक हेक्टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावे. तणनाशक फवारणीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
पाणी व्यवस्थापन कसे करावे?
बाजरी पिकास फुटवे येण्याच्या वेळी, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकास संरक्षित ओलित म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे.
उत्पादन : वरील सुधारीत तंत्राचा अवलंब केल्यास धान्याचे हेक्टरी २५ ते ३० क्विंटल आणि चाऱ्याचे ५ ते ७ टन उत्पादन मिळू शकते.