बटाटा लागवड तंत्रज्ञान : अशा पद्धतीने लागवड केल्यास होईल उत्पादनात भरघोस वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बटाटा लागवड तंत्रज्ञान : बटाटा पिकाची लागवड, पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फॉस्फरस यासारखी खनिजे आणि ब व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्यपदार्थाशिवाय जनावरांच्या खाद्यात व अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणावर होतो.

हवामान कसे असावे?

बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे. या पिकास सरासरी 16 ते 21 सेल्सियस तापमान लागते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात 24 अंश सें.ग्रे. तापमान पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात 20 अंश सें.ग्रे. तापमान अनुकूल असते. बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण व बटाटे पोसण्याच्या वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते.

जमीन कशी निवडावी?

मध्यम ते हलक्या व गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या पद्धतीने करता येते. जमीन कसदार, भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी. जमिनीचा सामू 6 ते 8 च्या दरम्यान असावा.

लागवड कधी करावी?

बटाट्याची लागवड खरीप हंगामात जून-जूलै महिन्यात तर रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करावी.

बियाण्याचे प्रमाण?

बियाणे उत्तम दर्जाचे असावे. हेक्टरी 20 चे 25 क्विंटल बियाणे लागवडीस पुरेसे असते. लागवडीपूर्वी बियाणे डायथेन एम- 45 हे 100 ग्रॅम 45 लिटर पाण्यात 5 मिनिटे बुडवावीत व नंतर लागवडीसाठी वापरावी.

पूर्वमशागत ?

जमीनीची 20 ते 25 सें.मी. नांगरट करावी. 1 महिनाभार जमिनीस ऊन द्यावे. पुन्हा एक आडवी नांगरट करावी. ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत हेक्टरी 50 गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे.

लागवड कशी करावी?

सरासरी बेण्याचे वजन जास्तीत जास्त 50 ते 100 ग्रॅम असावे. बेण्याचा आकार मध्यम असावा. बटाट्याचे आकारमानानुसार दोन ओळीतील अंतर 45 ते 60 सें.मी. आणि दोन बेण्यातील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी- वरंबा पद्धतीने लागवड केल्यास 20 × 20 सें.मी. अंतरावर लागवड करावी.

खते व पाणी व्यवस्थापन?

बटाटा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाशची आवश्यकता असते. बटाट्याची मुळे जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पाळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीलगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्या वेळेस 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात.

आंतरमशागत?

बटाट्याच्या आंतरमशागतीत तण काढणे व खुरपणी या बरोबर भर देणे हे महत्त्वाचे काम आहे. तीन चार वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. खतांचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीची भर द्यावी.

कोणते वाण निवडावेत?

कुफरी लवकर

ही 75 ते 80 दिवसात तयार होणारी जात असून खरीप व रब्बी हंगामात घेतली जाते. या जातीचे बटाटे पांढरे शुभ्र आकर्षक व मोठे असतात. या जातीचा बटाटा साठवणूकीत चांगला टिकतो. हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल असते.

कुफरी चंद्रमुखी

ही जात 80 ते 100 दिवसात तयार होते. या जातीचे बटाटे लांबट गोल व फिकट पांढरे असतात. साठवणूकीस ही जात उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन 250 क्विंटल पर्यंत मिळते.

कुफरी सिंदूरी

ही जात 120 ते 135 दिवसात तयार होते. या जातीचा रंग फिकट तांबडा असून बटाटे मध्यम व गोल आकाराचे असतात. ही जात साठवणूकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन 300 क्विंटल पर्यंत मिळते.

याशिवाय कुफरी बादशाह, कुफरी, कुबेर, कुफरी, ज्योती, कुफरी अलंकार, कुफरी चमत्कार या जाती लागवडीस योग्य आहेत.

रोग व कीड

अ) रोग

करपा

हा रोग पानावर काळपट ठिपके पडून पाने करपून गळतात. बटाट्यावर चट्टे पडतात.
उपाय- डायथेन एम- 45 किंवा डायथेन झेड-78 हेक्टरी 2 किलो फवारावे किंवा बोर्डो मिश्रण 1:1:100 या प्रमाणात पसरावे.
मर- मोठी झाडे पिवळी दिसतात. बुंध्यानजिक जमिनीलगतच्या भागावर बुरशीची वाढ झालेली दिसते. पिकांची फेरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात आणता येतो. जमिनीत नॅप्थॅलिन किंवा फॉरमॅलिन (1:50) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.

चारकोल रॉट किंवा खोक्या रोग

या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान 32 अंश सें.ग्रे. पेक्षा अधिक असल्यास ते रोजंतुना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नासतात. जमिनीचे तापमान 32 अंश सें.ग्रे. च्या वर वाढण्यापूर्वी बटाट्याची काढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.

कीड –

1) देठ कुरतडणारी अळी- राखी रंगाची अळी असून रात्रीचे वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने व कोवळे देठ खातात.
उपाय- या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम 5 टक्के पावडर हेक्टरी 50 किलो जमिनीवर सायंकाळी धुरळावी.
2) मावा व तुडतुडे- या किडीत पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात.
उपाय- लागवडीनंतर 15 दिवसांनी एन्डोसल्फान 35 ई.सी. 700 मि.ली. किंवा फॉस्फोमिडॉन 85 डब्ल्यू एमसी. 188 मिली 500 लिटर पाण्यात प्रति हेक्टरी मिसळून फवारावे.
3) बटाट्यावरील पतंग- ही कीड बटाट्याचे अतोनात नुकसान करते. या किडीची सुरुवात शेतातून होते. परंतु नुकसान हे साठवणूकीच्या काळात दिसून येते. या किडीच्या अळ्या पानात, देठात व खोडात शिरून पोखरतात. अळ्या बटाट्यात शिरून आतील भागात पोखरून खातात.
उपाय- या किडीच्या बंदोबस्तासाठी कार्बारील 50 डब्लू. पी. 1.5 किलो 750 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

काढणी आणि उत्पादन

सर्व सुधारीत तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पीक घेतल्यास लवकर तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन हेक्टरी 200 किंटल तर उशिरा तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन हेक्टरी 250 ते 300 क्विंटल पर्यंत येऊ शकते.

error: Content is protected !!