हॅलो कृषी ऑनलाईन: भावांतर योजना (Bhavantar Yojana) ही शेतकर्यांना कमी दराने शेतमाल विकल्यास होणारा तोटा टाळण्यासाठी राबवली जाणारी योजना आहे. देशात भावांतर योजना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना सन 2017 मध्ये मध्य प्रदेशात सर्वप्रथम लागू केली होती. यात त्यांनी शेतमालाचा बाजारभाव आणि एमएसपी यातील फरकाची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली होती. ज्या शेतमालाचे दर एमएसपीपेक्षा कमी होते आणि सरकारने त्या शेतमालाची एमएसपी दराने खरेदी केली नव्हती, अशावेळी त्यांनी ही योजना (Bhavantar Yojana) राबविली होती.
केंद्र सरकारच्या (Central Government) सीएसीपी (CSP) आणि राज्य सरकारने (State Government) काढलेल्या महाराष्ट्रातील 10 पिकांच्या उत्पादन खर्चात तसेच राज्य सरकारने शिफारस केलेल्या आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीत (MSP) मोठी तफावत असल्याचे सीएसीपीच्या एमएसपी रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांनी एमएसपी दराने शेतमालाची विक्री (Market Rate) केल्यास त्यांना तोटाच सहन करावा लागणार आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी राज्यात भावांतर योजना (Bhavantar Yojana) लागू करणे आणि दरातील तफावतीची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे.
राज्य सरकारने सन 2024-25 च्या खरीप विपणन हंगामासाठी (Kharif Season) राज्यातील खरीप पिकांचा उत्पादन खर्च (Kharif Production Cost) आणि त्याच पिकांच्या एमएसपीची (MSP) शिफारस केंद्र सरकारच्या सीएसीपी (Commission on Agricultural Costs and Prices) ला सादर केली. यात राज्य सरकारने कापसाचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 8,377 रुपये काढला आणि कापसाला 9,634 रुपये प्रति क्विंटल एमएसपी जाहीर करण्याची शिफारस केली. दुसरीकडे, सीएसीपीने महाराष्ट्रातील कापसाचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 6,453 रुपये काढला आणि लांब धाग्याच्या कापसाची एमएसपी 7,521 रुपये प्रति क्विंटल तर मध्यम लांब धाग्याच्या कापसाची 7,121 रुपये प्रति क्विंटल जाहीर केली. यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एमएसपी दराने कापूस विकला तर त्यांना प्रति क्विंटल किमान 2,593 रूपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे (Bhavantar Yojana).
राज्य सरकारने धानाचा उत्पादन खर्च 4,053 रुपये प्रति क्विंटल काढला असून, 4,661 रूपयांच्या एमएसपीची शिफारस केली. सीएसीपीने मात्र 3,520 रूपयांचा उत्पादन खर्च काढला आणि साधारण धानाची एमएसपी 2,300 रुपये तर ग्रेड ए धानाची एमएसपी 2,320 रुपये जाहीर केली. त्यामुळे धान उत्पादकांना प्रति क्विंटल 2,369 रूपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे (Bhavantar Yojana).
राज्य सरकारने सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 6,039 रुपये काढला असून, केंद्राकडे 6,945 रुपये एमएसपीची शिफारस केली. सीएसीपीने महाराष्ट्रातील सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 4,428 रुपये काढला आणि 4,892 रुपये एमएसपी जाहीर केली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना प्रति क्विंटल किमान 2,053 रूपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. ही स्थिती राज्यातील ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद व भुईमूग या पिकांचीही आहे.
किमान दीडपट दर द्या
एमएसपी ही त्या पिकाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट जाहीर केली जात असल्याचा दावा केंद्र सरकारच्या वतीने वारंवार केला जात आहे. केंद्र व राज्याने काढलेल्या एकाच पिकाच्या एमएसपी दरात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कापसाला किमान प्रति क्विंटल 12 हजार रुपये, धानाला 6 हजार रुपये, सोयाबीनला 9 हजार रूपयांप्रमाणे उर्वरित इतर सात पिकांना दर द्यावे. त्या पिकांचे बाजारभाव आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम यातील तफावत शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करावी (Bhavantar Yojana).