हॅलो कृषी ऑनलाईन : दक्षिणेकडील राज्यांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे काळी मिरीच्या (Black Pepper) उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय काळी मिरी व मसाला व्यापार संघटनेच्या (इप्सटा) माहितीनुसार २०२३-२४ यावर्षी देशात ७० हजार टन इतके काळ्या मिरीचे (Black Pepper) उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या हंगामात ६४ हजार टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात यावर्षी देशात मिरीच्या उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळी मिरीच्या उत्पादनातील अग्रेसर राज्य असलेल्या कर्नाटक राज्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे काळ्या मिरीच्या पिकास फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील काही क्षेत्रांमध्ये काळ्या मिरीच्या लागवडीत वाढ झाली आहे. ज्यामध्ये गुंटूर, नामाक्कल, कुडालूर, येरकौड, कोडाई कनाल आणि कोल्ली हिल्स या भागांचा समावेश आहे. त्यामुळे देशांतर्गत मिरीच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत बाजारातील तेजीमुळे मिरीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, शेतकऱ्यांमध्ये मिरीचे उत्पादन घेण्यास आकर्षण निर्माण होत आहे.
कर्नाटकात उत्पादन वाढणार (Black Pepper Production In India)
देशातील आघाडीचे काळी मिरी उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये यावर्षी चांगले पीक आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावर्षी कर्नाटकात मिरीच्या उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. २०२२-२३ या वर्षी काळ्या मिरीचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढून ३६ हजार टनांवर पोहचले आहे. जे २०२१-२२ यावर्षी ३० हजार टन इतके नोंदवले गेले होते. दरम्यान, चालू हंगामात २०२३-२४ मध्ये कर्नाटकमध्ये काळ्या मिरीचे उत्पादन वाढून ते ४० हजार टनांहून अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी लागवड
महाराष्ट्रातील कोकण विभागात अनेक ठिकाणी मिरी लागवड केली जाते. कोकण किनारपटटीतील हवामान या पिकाच्या लागवडीस अनुकूल असल्याने आणि काळी मिरीच्या वेलास आधाराची आवश्यकता असल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या कोकणातील आंबा, फणस, नारळ, सुपारीच्या झाडांवर वेल चढवून मिरी लागवड केली जाते. दरम्यान, काळ्या मिरीच्या उत्पादनात वाढ होणार असल्याने मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर होण्यास मदत होणार आहे. परिणामी काळी मिरीचे दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. गुणवत्तापूर्ण मिरीला जुलै २०२३ पासून उच्चांकी दर मिळत होता. त्यात काहीशी नरमाई येऊन तो ६०५ रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे.