हॅलो कृषी ऑनलाईन : काजू हे परकीय चलन (Cashew Nut Export) मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली 10.10 लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यापासून 7.45 लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. काजू लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक आहे. मात्र आता मागील पाच वर्षात भारतीय काजू निर्यातीत (Cashew Nut Export) निम्म्याने घट झाल्याचे समोर आले आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात भारताची काजू निर्यात ही 33.287 कोटी डॉलर (2773.14 कोटी रुपये) मूल्याची राहिली आहे. जी 2017-18 मध्ये 87.366 कोटी डॉलर (5627.81 कोटी रुपये- तत्कालीन रुपयाच्या किमतीवरून) इतकी नोंदवली गेली होती. अर्थात भारतीय रुपयामध्ये विचार करता काजू निर्यातीत 50 टक्क्यांहून अधिक घट नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये संयुक्त अरब अमिराती (युएई) हा देश भारतीय काजूचा सर्वात मोठा खरेदीदार देश राहिला आहे. वर्षभरात युएईने भारताकडून 12.60 कोटी डॉलर मूल्याच्या काजूची आयात केली आहे. यानंतर हॉलंड या देशाने 3.64 कोटी डॉलर आणि जपानने 3.523 कोटी डॉलर मूल्यांच्या काजूची आयात भारताकडून केली आहे.
निर्यातीत व्हिएतनामची आघाडी (Cashew Nut Export From India)
व्हिएतनामने जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत 2.95 अब्ज डॉलरची काजू निर्यात केली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत नोंदवल्या गेलेल्या निर्यातीपेक्षा 16 टक्क्यांनी अधिक आहे. व्हिएतनाम सरकारने चालू वर्षात 3.10 अब्ज डॉलरची काजू निर्यात करण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते. जी तेथील 2022 या वर्षातील निर्यातीपेक्षा (3.07 अब्ज डॉलर) थोडी जास्त आहे. व्हिएतनामकडून सध्या सुरु असलेल्या काजू निर्यातीची गती पाहता हे लक्ष्य साध्य करणे सरकारला सहजसोपे जाणार आहे.
स्थानिक मागणी
भारत काजू उत्पादनात आणि निर्यातीत प्रमुख देश होता. मात्र, आता व्हिएतनामने काजू निर्यातीत आघाडी घेतली आहे. भारताची देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी आहे. त्यामुळे उत्पादनातील अधिकांश भाग हा स्थानिक बाजारात विकला जात आहे. याउलट व्हिएतनाम हा छोटा देश असून, तेथील एकूण काजू उत्पादनापैकी 90 ते 95 टक्के काजूची निर्यात केली जात आहे. भारतातील एकूण काजू उत्पादनापैकी केवळ 10 ते 15 टक्के काजूची निर्यात होते.
आधुनिक यंत्र आणि मशिनरींचा वापर
व्हिएतनामने काजू उत्पादनासाठी आधुनिक यंत्र आणि मशिनरींचा वापर वाढवला आहे. ज्यामुळे तेथील काजूच्या उत्पादन खर्चात मोठी घट झाली आहे. परिणामी व्हिएतनामकडून आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त दरात काजू विक्री केली जात आहे. भारतीय काजूचा स्वाद आणि गुणवत्ता व्हिएतनामच्या तुलनेत चांगली असते. मात्र, स्वस्त असल्या कारणाने विदेशी आयातदार व्हिएतनामी काजूला पसंती देत आहे.