हॅलो कृषी ऑनलाईन : पर्यावरणातील बदलावांमुळे काजूचे उत्पादन (Cashew Variety) घटत असले तरी, प्रामुख्याने फुलोर्याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याच्या कमी प्रमाणाचा फटका काजूचे उत्पादन आणि उत्पन्नाला घटण्याला बसत आहे. अशा स्थितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी गेली सुमारे आठ वर्ष अभ्यास अन् संशोधन करून जादा उत्पादन क्षमता असलेली काजूची नवी जात (Cashew Variety) विकसित केली आहे.
मिळणार ‘एकेआर’ नाव (New Cashew Variety Developed By Farmer)
नव्या संशोधित जातीच्या (Cashew Variety) रोपांच्या फुलोर्यामध्ये नर जातीच्या फुलांपेक्षा मादी जातीच्या फुलांची संख्या जास्त असल्याने फुलोर्याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण अधिक असून साहजिकच त्यातून काजूचे भरघोस उत्पादन अन् शेतकर्याला जादा उत्पन्न मिळणार आहे. काजूच्या नव्या संशोधित जातीला ‘एकेआर’ हे नाव देण्यात येणार असून, या नव्या काजूच्या जातीला सरकार, कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाची मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शेतकरी खामकर यांनी म्हटले आहे.
काजूच्या नवीन जातीची वैशिष्ट्ये
- चौथ्या वर्षापासून उत्पन्नाला सुरुवात
- दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या कलमाची 20 ते 50 किलोपर्यंत उत्पन्न देण्याची क्षमता
- कलमांना खोडक्याचे आणि बुरशीचे प्रमाण कमी
- झाडाचे आयुष्य सरासरी 40 ते 50 वर्ष
- एकरी 70 झाडे बसू शकतात
- पिकलेल्या बोंडापासून काजू वेगळा करणे सहज सोपे
- मधमाशांचा वापर करून मधाचे अन् काजूचे भरघोस उत्पन्न घेणे शक्य
कमी श्रम, कमी खर्चात अधिक उत्पन्न
‘वेगुर्ला-4 वा वेगुर्ला-7 या जातीच्या काजूच्या झाडांपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे शेतकर्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे गेली सात-आठ वर्ष संशोधन आणि अभ्यास करून काजूची नवी जात विकसित करण्यात आपणाला यश आले आहे. अन्य जातीच्या काजूच्या झाडांपेक्षा संशोधित केलेली नवी जात कमी श्रम आणि खर्चामध्ये शेतकर्यांना जादा उत्पन्न मिळवून देणारी आहे. या जातीच्या रोपांचे आयुर्मानही तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे.’ असे शेतकरी अमर खामकर यांनी म्हटले आहे.