राज्यात पावसाची शक्यता; कशी घ्याल फळबागा आणि भाजीपाला पिकांची काळजी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 13 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 डिसेंबर रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 12 डिसेंबर रोजी जालना व औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

१) संत्रा/मोसंबी : बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरडया हवामानात फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे कोरडया हवामानात फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून कोरडया हवामानात फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

२)डाळींब: बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग ग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात.

३)चिकू: तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

४) द्राक्ष: तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने पाऊस झाल्यास बागेमध्ये ब्लोअर फिरवून द्राक्ष गुच्छांमध्ये साठलेले पाणी निघून जाईल याची काळजी घ्यावी. गुच्छातील पाणी काढून टाकण्यासाठी फलोत्पादन ग्रेडच्या खनिज तेलाचा (मिनरल ऑईल) चा वापर करावा.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून कोरडया हवामानात फवारणी करावी. तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या भाजीपाल्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

error: Content is protected !!