Compost Khat: कंपोस्ट खत तयार करायचे आहे? जाणून घ्या विविध पद्धती आणि महत्त्वपूर्ण बाबी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कंपोस्ट खत (Compost Khat) म्हणजे जीवाणूंच्या सहाय्याने शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या टाकाऊ स्वरुपाचा काडीकचरा, पानगळ, जनावरांची उष्टावळ व मलमूत्र यांना कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट खताला(Compost Khat)अनन्यसाधारण असे स्थान आहे. कारण या खतापासून नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्याबरोबर कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविली जातात. याशिवाय सेंद्रिय पदार्थांच्या विघटनानामुळे ह्यूमस तयार होऊन वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्ये तयार होतात.

कंपोस्ट खत निर्मिती पद्धती: ( Compost Khat preparation Methods)

(१) इंदौर पद्धत किंवा ढीग पध्‍दत (Heap Method): यामध्ये शेतीतील काडीकचरा, मलमूत्र, इतर सेंद्रिय पदार्थ एकत्र करून एक आड एक थरात पसरून साधारणतः: सहा फूट रूंद आणि सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून जमिनीवर ५ ते ६ फुट उंचीपर्यंत रचला जातो. अधूनमधून पाणी शिंपडून ओलावा टिकविला जातो. एक महिन्याच्या अंतराने ढीग तीन ते चार वेळा  वरखाली करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात. कुजण्याची क्रिया उघड्यावर ऑक्सीजनयुक्त वातावरणात होत असल्याने लवकर होते परंतु यामध्ये ओलावा लवकर उडून जातो व काही प्रमाणात अन्नद्रव्ये वायू रुपात वाया जातात. ढिगावर प्लास्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्यास मदत होते. तसेच अन्नद्रव्याचा ऱ्हास पण थांबवता येतो. अशा प्रकारे तयार केलेल्या कंपोस्ट खतामध्ये (Compost Khat) सुमारे ०.८ ते १.५ टक्के नत्र, ०.५ ते १.० टक्के स्फुरद, ०.८ ते १.८ टक्के पालाश आणि इतर दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध असतात.

(२) बंगलोर पद्धत किंवा खड्डा पध्‍दत : यामध्ये ६ फुट रूंद, ३ फुट खोल व सोयीनुसार लांबी असलेला खड्डा तयार केला जातो. खड्ड्याचा तळ व बाजू चांगल्या प्रकारे ठोकून घेतल्या जातात. त्यानंतर प्रथम ६ इंच जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला जातो. अशा क्रमाने खड्डा पूर्ण भरून जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फुट उंचीपर्यंत भरून माती व शेणकाल्याचे मिश्रण करून लिंपून घेतला जातो. खड्ड्यात ओलावा टिकविण्यासाठी अधूनमधून पाणी शिंपडले जाते. कुजण्याची क्रिया सुरुवातीस ऑक्सिजनयुक्त वातावरणात व नंतर ऑक्सिजन विरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो त्यामुळे कंपोस्ट खत (Compost Khat) तयार होण्यास लागणारा कालावधी वाढतो, अर्थात ढीग पद्धतीच्या तुलनेत अन्नद्रव्याचे वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.

(३) नॅडेप पध्‍दत: या पध्‍दतीत जमिनीवर पक्क्या विटांच्या साह्याने १० फुट लांब, ६ फुट रुंद व ३ फुट उंच अशा आकाराच्या टाकीचे बांधकाम केले जाते. विटाच्या दोन थरानंतर तिसर्‍या थरात खिडक्या सोडल्या जातात. नंतर या टाक्यामध्ये सुमारे दीड टन काडीकचरा, १०० कि. ग्रॅ. शेण व दीड टन चांगली चाळलेली जमिनीच्या वरच्या थरातील जीवाणूयुक्त माती भरली जाते. कंपोस्टची टाकी भरताना प्रथम टाक्याचा तळ चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घ्यावा व त्यानंतर ६ इंच जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थाचा थर द्यावा व त्यावर सुमारे १०० लिटर पाण्यात ४ ते ५ कि. ग्रॅ. शेण मिसळून शिंपडले जाते. यानंतर साधारणतः: अर्धा इंच जाडीचा चाळलेल्या मातीचा थर देऊन परत पाणी शिंपडून ओला केला जातो. याप्रमाणेच पूर्ण टाकी भरली जाते व अधूनमधून पाणी टाकून टाकीत योग्य तो ओलावा (५० ते ६० टक्के) राखला जातो.

अशा प्रकारे टाकीमध्ये कुजण्याची प्रक्रिया सर्वच थरात ऑक्सिजनयुक्त वातावरणात जलद व सारख्याच प्रमाणात होते. त्याशिवाय कंपोस्ट खत (Compost Khat) तयार होत असताना ओलावा तितक्या प्रमाणात उडत नाही आणि अन्नद्रव्यांचा र्‍हास पण होत नाही व ३ ते ४ महिन्यात उत्कृष्ट कुजलेले चांगले कंपोस्ट तयार होते.

कंपोस्ट खत तयार करताना घ्यावयाची काळजी (Care to be taken while preparing compost Khat)

  • चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत (Compost Khat) तयार होण्यासाठी वापरण्यात येणारा काडीकचऱ्यामध्ये जनावरांचे शेण, मूत्र मिसळल्याने प्रत चांगली होते. ते जलद कुजण्यास मदत होते.
  • तूर, कापसाच्या पऱ्हाट्या, धस्कटांचे बारीक तुकडे करून कंपोस्ट खत (Compost Khat)  निर्मितीसाठी वापरावे.
  • कार्बन, नत्राचे प्रमाण अधिक असणारे सेंद्रिय पदार्थ उदा. गव्हाचे काड, भात पेंढा, भुईमुगाची टरफले यापासून कंपोस्ट खत तयार करावयाचे असेल, तर प्रत्येक थरावर जनावराचे शेण, गोमूत्राच्या स्लरीचा हलका शिडकावा करावा किंवा हे शक्य नसेल, तर युरिया किंवा अमोनिअम सल्फेटचे १.५ ते २.५ टक्के तीव्रतेचे द्रावण शिंपडावे, जेणेकरून त्यातील नत्राचे प्रमाण वाढून खत लवकर तयार होईल.
  • खत लवकर कुजण्यासाठी त्यात नेहमी ओलावा राहील याची काळजी घ्यावी.

सुपर कंपोस्ट खत (Super Compost Khat) : रासायनिक खताच्या तुलनेत कंपोस्ट खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असते, त्यातील अन्नद्रव्यांचे विशेषत: स्फुरदाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक थरात १० ते १५ किलो सुपर फॉस्फेटचा थर देतात. यापासून तयार झालेल्या कंपोस्ट खतालाच सुपर कंपोस्ट खत असे म्हणतात. यामुळे कुजण्याची क्रिया तर लवकर होतेच पण त्याबरोबरच स्फुरद तसेच नत्राचे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. कंपोस्ट खताचा (Compost Khat) दर्जा सुधारतो.

error: Content is protected !!