हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना कॉंग्रेस गवत (Congress Grass) हे शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुःखी असते. त्यालाच काही भागात ‘गाजर गवत’ असेही म्हणतात. एक वेळ शेतकऱ्यांना काही पिकांची माहिती नसते. मात्र हे काँग्रेस गवत सर्व शेतकरी कुटुंबात लहान मुलाला देखील माहिती असते. मात्र हे गवत भारतात सर्वात प्रथम कुठे आढळून आले? ते कोणत्या देशातून भारतात आले? आणि या गवताच्या नायनाट करण्यासाठी काय उपाय आहेत? याबाबत आज आपण सविस्तरपणे (Congress Grass) जाणून घेणार आहोत.
पुण्यात प्रथम सापडले (Congress Grass Organic fertilizer)
कृषी संशोधकांच्या उपलब्ध माहितीनुसार, काँग्रेस गवत (Congress Grass) हे भारतात सर्वप्रथम 1956 साली महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आढळून आले होते. तेव्हापासून हे गवत शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. हे गवत मूळचे मेक्सिको, अमेरिका, त्रिनिदाद आणि अर्जेंटीना या देशातील आहे. पहिल्या काळात हे गवत फक्त काही मोजक्या माळरान जमिनीवर दिसून येत होते. मात्र देशातील सर्व भागांमधील सर्व पिकात, फळबागांमध्ये, रस्ते, जंगल अशा ठिकाणी ते पसरले आहे. अमेरिकेतून या गवताचे बियाणे भारतात धान्यांमार्फत आल्याचे मानले जाते.
काँग्रेस नाव का पडले?
हे गवत अनावश्यक येणारे आणि येड्यागत वाढणारे गवत असल्याने तसेच त्याचे अस्तित्व संपत नसल्याने त्याला देशात ‘कॉंग्रेस गवत’ हे नाव पडले आहे. ज्या पद्धतीने काँग्रेस हा राजकीय पक्ष आपले अस्तित्व आणि सत्ता देशात टिकवून आहे. पक्षाच्या या चिकाटी गुणधर्मासोबत साधर्म्य साधत असल्याने त्याला ‘कॉंग्रेस गवत’ हे नाव पडले आहे.
कुठेही वाढू शकते
काँग्रेस या गवतामध्ये ‘सेस्क्यूटरपीन लेक्टोन’ नावाचे विषारी द्रव्य आढळून येते. ज्यामुळे शेतामध्ये हे गवत असल्यास त्याचा पिकांच्या उगवण व वाढीवर विपरीत परिणाम होतो. या तणामुळे जागोजागी लहान रस्ते, शेतांचे बांध पूर्णतः झाकोळून गेलेले दिसतात. या गवताच्या सानिध्यात बऱ्याचदा आल्यास माणसाला त्वचेचा आजार, ताप, दमा यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. दुधाळ जनावरांनी काँग्रेस गवत खाल्यास दूध उत्पादनात मोठी घट होते. या गवताची विशेषतः म्हणजे ते कोणत्याही वातावरणात आणि जमिनीमध्ये वाढू शकते.
कसे कराल नियंत्रण?
काँग्रेस या गवताला (Congress Grass) पांढऱ्या रंगाची फुले येतात. या गवताचे एक झाड जवळपास 5000 से 25000 काँग्रेस गवताचे बियाणे तयार करू शकते. हे बी हलके असते. त्यामुळे ते पावसाळ्यात पाणी, हवेमार्फत सहज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. त्यामुळे या गवताला समूळ नष्ट करण्याचा सर्वात प्रभावी आणि रामबाण उपाय हा त्याला बियाणे येण्याचे उपटून टाकणे हा असतो. त्याला राउंड अप या विषारी तणनाशकाच्या वापराने देखील विशेष इजा होत नाही. ते पुन्हा डोकावते. त्यामुळे शेतकरी हे गवत उपटून एका जागी जमा करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करू शकतात. हे सेंद्रिय खत पूर्णपणे सुरक्षित असते. त्यातून काँग्रेस गवताचा कोणताही प्रसार होत नाही. त्याचे खतात रूपांतर होताना पूर्ण विघटन झालेले असते. या खतापासून पिकांना पोषक घटक मिळून उत्पादन वाढीस मदत होईल. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी हे गवत आढळेल त्या-त्या वेळी बियाणे येण्याच्या आत त्यापासून सेन्द्रिय खत निर्मिती करावी. काँग्रेस गवताचा नायनाटही होईल आणि पिकांना खतही मिळेल.