हेलो कृषी ऑनलाईन : कापूस पिकामध्ये ऑगस्ट महिन्यापासून डोमकळीचा प्रादुर्भाव गुलाबी बोंडअळीच्या (Pink bollworm in cotton crop) स्वरूपात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कापूस पिकात पहिल्या अवस्थेमध्ये गुलाबी बोंडअळी (Pink bollworm in cotton crop) फुलांमध्ये शिरते. ही बोंडअळी पाकळ्यांना लाळेद्वारे एकमेकांना जोडून स्वतःला संरक्षणासाठी बंदिस्त करून घेते. प्रादुर्भावग्रस्त फुले ही अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीप्रमाणे दिसतात. अशा कळ्यांना म्हणजेच डोमकळ्या म्हटले जाते. या डोमकळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात घट येते.
गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्यात?
- पिकांचे नियमित सर्वेक्षण करावे.
- फुले लागल्यानंतर फुलांचे तसेच हिरव्या बोंडाचे निरीक्षण करावे.
- लागवडीच्या ४५ दिवसानंतर सर्व्हेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
- तसेच सामुहिकरीत्या पतंग गोळा करण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत.
- गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे.
जैविक व्यवस्थापन
- ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
- ट्रायकोग्रामाटॉयडी बॅक्ट्री या परोपजिवी गांधीलमाशीने परोपजीवीग्रस्त १.५ लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात पीक ५०-६० दिवसाचे झाल्यानंतर दोन वेळा वापरावी.
आर्थिक नुकसानीची संकेत पातळी कशी ओळखावी? - एका सापळ्यावर ८ पतंग सलग तीन दिवस दिसल्यास किंवा १० फुलांवर किंवा १० बोंडांवर एक अळी दिसून आल्यास आपल्या पिकाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे असे समजावे.
गुलाबी बोंडअळीच्या (Pink bollworm in cotton crop) नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करावी.
- प्रोफेनोफॉस (५० ईसी) २ मि.लि. प्रतिलिटर पाणी किंवा
- क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि. प्रतिलिटर पाणी किंवा
- थायोडीकार्ब (७५ डब्ल्युपी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा
- लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी