Cotton : राज्यात कापूस पिक मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. अनेकदा कापूस पिकाची पाने लाल झालेली दिसतात. त्यालाच लाल्या रोग असे म्हणतात. लाल्या रोगामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकरी चिंतेत आहे. या रोगाची लक्षणे काय आहेत? रोग येण्याची कारणे कोणती अन त्यावर उपाययोजना काय कराव्यात याबाबत आम्ही तुम्हाला या लेखातील माहिती देणार आहोत.
रोगाची लक्षणे
कपाशीची पाने टोकाकडून कडेने पिवळी पडतात. त्यानंतर पानांमधील हरिद्रव्य नष्ट होते. त्यानंतर कापूस पिकाची पाने लाल होण्यास सुरुवात होते. प्रादुर्भाव झालेली पाने गळून पडतात. तसेच कपाशीची पाने, फुले गळून पडतात.
रोग येण्याची कारणे काय
कापूस पीक घेण्यापूर्वी शेतामध्ये उस, केळी, मका ही जास्त अन्नद्रव्य घेणारी पिके घेतल्यानंतर त्या जागी कपाशीची लागवड केली असेल तर कपाशी पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. पिकांची फेरपालट न करणे, हलक्या जमिनीत कपाशी घेणे, पिकाला पाण्याचा जास्त ताण पडणे किंवा जमिनीवमध्ये जास्त पाणी साचणे.
लागवडीपूर्वी काय काळजी घ्यावी
कापूस पिकाची योग्य वेळेत पेरणी करावी. दिवसाचे तापमान ४०°c पेक्षा कमी असल्यावर व ७५ मि.मी. पाऊस झाल्यावर पेरणी करावी. पेरणी अगोदर जमिनीत शेणखत मिसळावे. झाडाच्या गरजेनुसार सिंचनाचे नियोजन करावे. लागवडीसाठी योग्य अंतर असणे आवश्यक आहे. माती परीक्षण करून पिकाला खताची मात्रा देणे आवश्यक आहे. पिक काढणीनंतर खोल नांगरट करून घ्यावी.
उपाययोजना काय कराव्यात
१) कपाशी पिकावर एक टक्के युरियाची फवारणी करावी. म्हणजेच १५० ग्रॅम युरिया १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) ५० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अशाप्रकारे कपाशीमध्ये लाल्या रोगाचे नियंत्रण केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते.