Cotton Seeds : बीटी कापूस बियाणाच्या दरात प्रतिपाकीट 13 रुपयांनी वाढ; वाचा… कितीये किंमत?

Cotton Seeds Price In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सरकारच्या नियंत्रणातील बीटी कापूस बियाणांच्या (Cotton Seeds) दरात यंदा १३ रुपये प्रतिपाकीट वाढ झाली आहे. त्यामुळे आता यावर्षी बीटी कॉटन बियाण्याच्या एका पाकिटासाठी शेतकऱ्यांना आता ८६४ रुपये मोजावे लागणार आहेत. परिणामी, वाढलेल्या दरामुळे बियाणे कंपन्यांच्या तिजोरीमध्ये यंदा अतिरिक्त पाच कोटी ४६ लाख रुपयांची भर पडणार आहे. ज्यामुळे वाढीव कापूस बियाणे (Cotton Seeds) दराचा शेतकऱ्यांना अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे.

42 लाख पाकिटांची आवश्यकता (Cotton Seeds Price In Maharashtra)

महाराष्ट्रात यंदा मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत ९ लाख ८३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रासाठी सुमारे ४२ लाख सरकी बियाणे पाकिटांची गरज आहे. कृषी विभागाने बियाणे कंपन्यांकडे सरकी पाकिटांची आगाऊ मागणी नोंदविली आहे. यामुळे खरीप हंगामाचा बाजार काबीज करण्यासाठी बियाणे कंपन्यांनी बाजारात सरकी बियाण्यांची लाखो पाकिटे त्यांच्या गोडाऊनमधून कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचवल्या आहेत.

चढ्या भावाने विक्री केल्यास कारवाई

कृषी विभागाकडून सरकी बियाणांची सुमारे ४२ लाख पाकिटे बाजारात उपलब्ध करण्यात येत आहेत. बियाणे कंपन्यांही मुबलक प्रमाणात बाजारात बियाणे उपलब्ध करत आहेत. प्रतिपाकीट ८६४ रुपये दर निश्चित केला असून, कोणत्याही व्यापाऱ्याने चढ्या दराने बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

1 जूननंतरच लागवडीस परवानगी

दरम्यान, बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील वर्षी ३० मेपर्यंत सरकी बियाणे विक्रीस मनाई होती. यंदा सरकारने बंदी उठवली आहे. व्यापारी बियाणे विक्री करू शकतात, परंतु शेतकऱ्यांना १ जूननंतरच सरकीची लागवड करण्यास परवानगी असणार आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे निर्देश आहेत. असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.