Crop Advisory: शेतकरी बंधुंनो, पुढील आठवड्यात पिकांची अशी घ्या काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पिकांवर हवामानाच्या चढ उताराचा परिणाम होत असतो. अशावेळी पिकांची (Crop Advisory) योग्य काळजी घेणे गरजेचे असते. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई तर्फे प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी खालील प्रमाणे वेगवेगळ्या पिकांचे व्यवस्थापन (Crop Advisory) करावे.

शेत पिकांचे व्यवस्थापन (Crop Advisory)

  • हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामुळे, हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.                                                    हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  
  • करडई पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. सध्याचे कमाल व किमान तापमान हे मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे, करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा अॅसिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  
  • हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रुवारी पर्यंत करता येते. 
  • हळद पिकाच्या काढणीस साधारणतः: फेब्रुवारी महिन्यात सुरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पि‍काला पाणी देणे बंद करावे. 
  • उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत.

फळबागेचे व्यवस्थापन (Crop Advisory For Fruit Crops)

  • मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी फळबागेत फळाचा आकार वाढण्यासाठी 00:00:50 1 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • संत्रा/मोसंबी बागेत खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. 
  • तोडणीस तयार असलेल्या मृग बहार डाळिंब फळांची तोडणी करावी. डाळिंब बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.
  • चिकू बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला पिके व्यवस्थापन (Crop Advisory)

  • भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
  • मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामुळे, वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भावग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामुळे, काकडी वर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी अॅझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग (The Mulberry Silk Industry)

रेशीम कीटकांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी संगोपन गृहात कोळशाची शेगडी किंवा इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करावा. संगोपन गृहात कोळश्याचा धूर होणार नाही याची काळजी घ्यावी व तापमान 22 ते 28 अंश.से. व आर्द्रता 80 ते 85 टक्के राहील याची काळजी घ्यावी.

फांदी पद्धती मध्ये 20 टक्के मजुरीत बचत होते. कच्या संगोपन गृहात थंडी किंवा उष्णता मर्यादीत ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सीमेंट कॉक्रेटचं संगोपन गृह बांधकाम करून घ्यावे. त्यामुळे रेशीम कीटक रोगास बळी पडत नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते.

error: Content is protected !!