पावसामुळे पिकांचे नुकसान; कशी वाचवाल रोग आणि किडींपासून खरीप पिके ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 19 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 20 ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन : सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 25% 40 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर दहा पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळ्या (स्पोडोप्टेरा, उंटअळी, केसाळअळी, घाटेअळी) यांच्या व्यवस्थापनासाठी फ्लुबेंडामाईड 39.35% 3 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% + सल्फर 65% 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

खरीप ज्वारी : पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 % 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

बाजरी : पिकात वापसा आल्यानंतर आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

हळद : पिकात बायोमिक्सची आळवणी करावी. आळवणीसाठी 25 ते 50 लिटर पाण्यात 4 किलो (पावडर)/ 4 लिटर (लिक्वीड) बायोमिक्स याप्रमाणे द्रावण तयार करावे व ते ठिबक सिंचनाद्वारे पिकास सोडावे किंवा पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत फळ गळ दिसून येत असल्यास एनएए 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत वर खताची मात्रा 400 ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावी. डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत वर खताची मात्रा 300 ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावी. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. चिकू बागेत वर खताची मात्रा 650 ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावी.

भाजीपाला

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात पावसाची उघाड बघून मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चारा पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे,
मुख्य प्रकल्प समन्वयक,
ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Leave a Comment

error: Content is protected !!