हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीचा पाऊस धुमाकुळ घालत असून त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान (Crop Damage) होत आहे. कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, चांदवड, येवला तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कांदा पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा कांदा पिकाचा उत्पादन खर्च सुध्दा निघणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
मका, कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Crop Damage)
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात धावडा परिसरात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन काढून गंजी केल्या होत्या मात्र वादळी वारा व पावसामुळे सोयाबीनच्या गंजीत पाणी शिरल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील व जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे दिवाळीआधी शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.