हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

महापुरामुळे बाधित पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा, राजू शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी अतिवृष्टी, महापूर यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होतं. या नुकसानीमुळं शेतकरी पुरता कोलमडतो. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असते. म्हणून सरकारने तातडीने महापूरबाधित होणाऱ्या पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्रात शेट्टींनी ही मागणी केली आहे.

‘या’ पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा

महापूर पट्ट्यात दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. विशेषत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मोठे पूर आले होते. गेल्या काही वर्षांत या जिल्ह्यांमध्ये पाच मोठे महापूर येऊन शेतकऱ्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 2019 व 2021 च्या महापुरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या महापुरात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. गतवर्षी नुकसान होऊनही राज्य सरकारने अतिशय तोकडी मदत देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. ऊस, भात, सोयाबीन, केळी, तसेच भाजीपाला ही पिके प्रामुख्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बागायती पट्ट्यामध्ये घेतली जातात. वेळोवेळी आलेल्या महापुराच्या तडाख्याने ही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होतात. या पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

उसाला एकरी 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी

दरम्यान, पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकरी भरण्यास तयार आहेत. या पीक विम्यामुळे सरकारला नुकसान भरपाई देताना कोणताही बोजा पडणार नाही. तसेच शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे शेट्टी म्हणाले. महापुरामुळे वेळोवेळी नुकसान भरपाई होणे आता शेतकऱ्यांना अजिबात परवडणारे नाही. महापूरग्रस्त शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महापूर पट्ट्यातील सर्व पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. उसाच्या पिकाला एकरी 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच सोयाबीन 50 रुपये आणि केळीला 2 लाख रुपयांची मदत करावी. त्याचबरोबर भाजीपाला पिकांचा देखील पीक विम्यामध्ये समावेश करावा अशी मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली आहे.

error: Content is protected !!