Dairy Production : देशातील दूध उत्पादन 9.52 दक्षलक्ष टनांनी वाढले; उत्तरप्रदेशची आघाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2022-23 या वर्षात देशातील दुग्ध उत्पादनात (Dairy Production) मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात देशातील दुग्ध उत्पादन 9.52 दक्षलक्ष टनांनी वाढले असून, उत्तर प्रदेश या राज्याने देशात सर्वाधिक दूध उत्पादन (Dairy Production) करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या ‘पशुपालन सांख्यिकी अहवाल 2023’ मध्ये याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, वैश्विक दूध उत्पादनात भारताची आघाडी कायम आहे. मागील दहा वर्षात देशातील दूध उत्पादन 146 दशलक्ष टनांवरून वाढून ते 2022-23 यावर्षी 230.58 दशलक्ष टनांपर्यंत नोंदवले गेले आहे. 2021-22 मध्ये 221.6 दशलक्ष टन दूध उत्पादन झाले होते. अर्थात वर्षभरात देशात 9.52 दक्षलक्ष टनांनी दूध उत्पादन वाढले आहे. तर 2018-19 मध्ये 187.75 दशलक्ष टन दूध उत्पादन नोंदवले गेले होते. अर्थात मागील पाच वर्षात देशातील दूध उत्पादनात 22.81 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

देशातील प्रथम पाच राज्ये (Dairy Production In India)

अहवालातील आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये देशातील एकूण दूध उत्पादनात उत्तरप्रदेश या राज्यांचा सर्वाधिक 15.72 टक्के वाटा आहे. त्यानंतर राजस्थान (14.44 टक्के), मध्यप्रदेश (8.73 टक्के), गुजरात (7.49 टक्के) आणि आंध्रप्रदेश (6.70 टक्के) या राज्यांनी अनुक्रमे पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांमध्ये तूप आणि बटरच्या निर्यातीतही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये देशातील दूध उत्पादन हे मागणी पेक्षा अधिक राहिले तरी त्याचा देशाला फायदाच होणार आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यात वाढीसाठी यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. कारण भारताच्या शेजारील देशांमध्ये दुधापासून बनलेल्या दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी आहे. असे दुग्ध व्यवसायातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!