हॅलो कृषी ऑनलाईन : धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 151 फूट उंच भव्य दिव्य भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलाय. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ९१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलीय. २४ तास दिवस रात्र हा हिंदवी ध्वज डौलाने फडकत राहील असं म्हंटल जातंय… मात्र याच्यावरून एका तरुणाने सोशल मीडियावर उपरोधिक पोस्ट शेअर करत सरनाईक याना टोला लगावला आहे. या ध्वजामुळे सर्वात मोठा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल, या भव्य ध्वजामुळे जिल्ह्यात रोजगार निर्माण होतील, शेतमालाला भाव मिळेल, शेतकऱ्याला दुप्पट फायदा होईल असा टोला या तरुणाने लगावला आहे…. मयूर डुमणे असं या सदर तरुणाचं नाव असून फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी सरकारवर टीका केली आहे….
काय आहे मयूर डुमणे यांची फेसबुक पोस्ट –
दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी 151 फूट भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. यासाठी 91 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. हा ध्वज उभारल्याचा सर्वात मोठा फायदा येथील शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने उत्पादीत केलेल्या शेतमालाला तसेच दुधाला या भव्य ध्वजामुळे चांगला भाव मिळणार आहे. तसेच या भव्य ध्वजामुळे जिल्ह्यात रोजगार निर्माण होऊन शहराकडे रोजगारासाठी जाणाऱ्या तरुणांचं होणारं स्थलांतर थांबणार आहे. जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती या ध्वजामुळे निर्माण होईल. भव्य ध्वजाकडे पाहिल्यानंतर आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे, बेरोजगाराचे मनपरिवर्तन होऊन या आत्महत्या रोखल्या जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव केल्यानंतर जितका फायदा जिल्ह्याला झाला त्यापेक्षा दुप्पट फायदा हा 151 फूट झेंडा उभारल्याने होणार आहे.
महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी नागरिकांची भटकंती यामुळे थांबणार आहे. जिल्ह्यातील सर्वांच्या घरी नळाने पाणी येणार आहे कारण जल जीवन मिशनची कामे हा भगवा ध्वज उभारण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेगाने होणार आहेत. तसेच महावितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळून कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथील चोंदे या शेतकऱ्याने सिताफळाच्या बागेवर जेसीबी फिरवला होता. आता या भगव्या ध्वजामुळे ती सिताफळाची झाडे पुन्हा उगवणार आहेत. 24 तास फडकणाऱ्या या ध्वजामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार आहे. पालकमंत्र्याच्या या 151 फूट दूरदृष्टीचे जिल्ह्यातील जागरुक नागरिकांकडून कौतुक होत आहे. हा 151 फूट ध्वज म्हणजे खरंतर रयतेचं स्वराज्य उभा करून आपल्या समोर आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अंमलबजावणीचं आहे असं म्हणत मयुर डुमणे यांनी या हिंदवी ध्वजावरून उपरोधिक टोला लगावलाय…