हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्राच्या नव्या कृषी धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी ते खरेदीदार यांच्यातील सौहार्दपू्र्ण व्यवहारामुळे शेत माल विक्रीला अधिक गती मिळाली आहे. पंढरपूर जवळच्या आढीव येथील शेतकरी व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या भगव्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी झाली आहे. प्रतिकिलो 70 रुपये दराने 25 टन डाळिंबाची बांधावर बसून त्यांनी थेट पर राज्यात विक्री केली आहे.
विक्री व्यवस्थेतील दलालांची साखळी तोडून थेट शेतकरी ते खरेदीदार यांच्यात चोख व्यवहार सुरु झाल्याने याचा शेतकर्यांना फायदा होवू लागला आहे. लक्ष्मण शिरसट यांची आढीव येथे 20 एकर कोरडवाहू शेती आहे. अत्यल्प पाणी असल्याने त्यांनी खडकाळ माळरानात चार एकर डाळिंब व दोन एकर केशर आंब्याची लागवड केली आहे. गतवर्षी त्यांनी युरोपात डाळिंबाची निर्यात केली होती.यावर्षी कोरोना आणि सततच्या हवामान बदलामुळे निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेता आले नाही. तरीही पाणी, खतांचे योग्य नियोजन करुन त्यांनी या वर्षी डाळिंबाचे भरघोस उत्पन्न घेतले आहे.
त्यांच्या शेतातील तीन एकर डाळिंबाची तोडणी झाली आहे. बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे लाल चुटूक आणि रसाळ डाळिंबा फळांना मागणी वाढली आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शेतीमालाचे दर पडले आहेत. त्यामुळे कवडीमोल भावाने शेतीमालाची विक्री करावी लागली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.कोरोनाचा प्रादु्र्भाव कमी होत असल्याने पुन्हा शेतीमालाची खरेदी विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे बाजारात डाळिंबाचे भाव वधारले आहेत. त्यातच थेट शेतकरी ते खरेदीदार यांच्यात व्यवहार सुरु झाल्याने शेतकर्यांना अधिकचे
चार पैसे मिळू लागले आहेत.
शिरसट यांच्या तीन एकर डाळिंब बागेतील 25 टन डाळिंबाची केरळ येथील व्यापार्याला जागेवरती विक्री केली आहे. डाळिंब विक्रीतून 17 लाख रुपये हाती आले आहेत. 5 लाख रुपयांचा डाळिंब उत्पादनाचा खर्च वजा जाता त्यांना 12 लाख रुपये निवळ्ळ नफा मिळाला आहे. जिद्द, मेहनत आणि बाजारपेठेचे ज्ञान अवगत केल्यास डाळिंब शेतीतून चांगले पैसे मिळू शकतात हे लक्ष्मण शिरसट यांनी आपल्या डाळिंब शेतीच्या प्रयोगातून सिध्द
केले आहे.