असे करा कापूस, तूर, भुईमूग पिकातील कीड आणि रोग व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्हयात दिनांक 26 व 27 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सद्य हवामानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस : पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बूप्रोफेंझीन 25% 400 मिली प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात.

तुर : वेळेवर पेरणी केलेल्या तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मूग/उडीद : पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर फवारणी करावी.

भूईमूग : पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे ड्रम फिरवावे. त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते.

मका : उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. केळी बागेत 50 ग्रॅम नत्र प्रति झाड खतमात्रा दिली नसल्यास द्यावी. द्राक्ष बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. द्राक्ष बागेत पानांची विरळणी करावी व शेंडा खुडावा. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. द्राक्ष बागेत जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सिताफळ बागेत आंतरमशागतीच कामे करून तण नियंत्रण करावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील मर (ॲन्थ्रॅकनोझ) व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!