हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न (Drought) हा खूप गंभीर बनला आहे. यंदा कमी पाऊस असल्याने जिल्ह्यातील अनेक लहान मोठे प्रकल्प, विहिरी, बंधारे हे कोरडे ठाक पडले आहेत. जिल्ह्याच्या भूजल पातळीत देखील घट झाली आहे. परिणामी, सध्या पाणी टंचाई भेडसावत असल्याने, जिल्ह्यात आता चार बंदीचे आदेश संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आहेत. परिणामी, आता जिल्ह्यात उत्पादित जनावरांचा चारा जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास पूर्णतः बंदी (Drought) असणार आहे.
चारा टंचाईचे भीषण संकट (Drought In Maharashtra)
संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळी (Drought) परिस्थितीमुळे पाण्याबरोबरच चारा टंचाईचे भीषण संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याबाहेर चारा विक्री आणि वाहतुकीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख 58 हजार 251 लहान तर 4 लाख 74 हजार 752 अशी एकूण सहा लाख 3 हजार जनावरे असून, त्यांना आगामी काळात चाऱ्याची कमतरता भासू नये. यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्याबाहेर चारा वाहून नेण्यास ही बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दुष्काळाच्या झळा आणखीनच तीव्र
दरम्यान, यंदाचा पावसाळा महिनाभरावर येऊन ठेपला आहे. असे असतानाच सध्या संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आणखीनच तीव्र होताना दिसत आहे. शेतात असलेल्या फळबागांना पाणी देता येणे शक्य नाही. यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील मोसंबीच्या बागा सुकल्या आहे. या वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, शेतातील विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या मोसंबी बागांवर कुऱ्हाड चालवली असल्याचे दिसून आले आहे. तर काही शेतकरी आपल्या बागा वाचविण्यासाठी टँकरचे विकतचे पाणी घेऊन आटापिटा करत आहे.