Drought : राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा – वडेट्टीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस (Drought) पडलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पिकांना याचा मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरसकट दुष्काळ (Drought) जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, आणि अन्य नगदी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च करूनही हाती काहीच न आल्याने राज्यातील शेतकरी वर्ग चिंतेत आहे. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष असून, त्या ठिकाणी केवळ काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येते.. तर अन्य भागांचीही परिस्थिती काही वेगळी नाही. त्यामुळे वर्ष काढायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शेतकरी वाचला पाहिजे, त्यामुळे शेतकरी कर्जमाफीशिवाय पर्याय नाही, असेही वड्डेट्टीवार यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांची अवयव विक्रीची मागणी (Drought In Maharashtra)

सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करताना वडेट्टीवार यांनी हिंगोली जिल्ह्यातील एका दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने सरकारला पाठवलेल्या अवयवांच्या दरांवरूनही सरकारवर टीकास्र सोडले आहे. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांनी किडनी लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घ्या, अशी मागणी निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या शेतकऱ्यांनी किडनी 75,000 प्रति 10 नग, लिव्हर 90,000 प्रति 10 नग, डोळे 25,000 प्रति 10 नग अशा प्रकारे स्वतःचे अवयव विकत घ्या, अशी मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या घटनेवरून वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

सरकारचे झोपेचे सोंगे

राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे? आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे? याचे भान सरकारला नाही. हेच शेतकरी जर आमदार खासदार असते. तर त्यांच्याकरीता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. मात्र झोपेचे सोंग घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असे वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

error: Content is protected !!