हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या संपूर्ण वर्षभरात एल-निनोचा प्रभाव असल्याने (Drought) राज्यासह देशभरात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. ज्यामुळे राज्यात यंदा जवळपास 40 तालुक्यांमध्ये तसेच 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली होती. ज्यामुळे सध्या ऐन मे महिन्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे जलस्रोत आटले असून, फळबागांना पाणी द्यायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. ज्यामुळे सध्या अनेक शेतकरी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा तोडताना (Drought) दिसून येत आहे.
मोठे आर्थिक नुकसान (Drought In Maharashtra)
पेरू बागेला द्यायला पाणीच नसल्याने, नाशिक जिल्ह्यातील येवला तालूक्यातील शेतकरी हरिभाऊ लासुरे यांनी आपली दोन एकर पेरु बाग तोडली आहे. शेतकरी हरिभाऊ लासुरे यांनी मोठ्या आशेने दोन एकरात पेरु बाग लावली होती. मात्र, पेरुला अपेक्षित दर नाही, त्यातच बागेला देण्यासाठी यंदाच्या उन्हाळ्यात पाणीच शिल्लक नसल्याने, बाग पूर्ण सुकून गेली आहे. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव लासुरे यांच्यावर आपली संपुर्ण दोन एकर पेरु बाग तोडण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी मोठी गुंतवणूक करून फळबाग उभी करत असतात. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पाण्याचे स्रोत आटले
मागील संपूर्ण वर्षभरात झालेल्या कमी पावसामुळे, यंदा राज्यातील सर्वच भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. नद्यांना पाणी आले नसल्याने, विहिरी व कूपनलिकांसारखे पाण्याचे स्रोत आटले आहेत. ही परिस्थिती संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पाहण्यास मिळत असून, जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे नदी, नाले, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. यामुळे त्याचा परिणाम शेतीवर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. शेतात असलेल्या बागा तसेच पिकांना पाणी देता येत नाही. तर आता पावसाळ्यापूर्वी लागवड केल्या जाणाऱ्या पिकांचे क्षेत्र देखील घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.