हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असतानाच राज्यातील काही भागात दुष्काळाची (Drought) दाहकता वाढत चालली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत परिस्थितीची माहिती दिली आहे. तसेच राज्य सरकारने दुष्काळ (Drought) निवारणाबाबत उपाय योजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
काय म्हणालेत शरद पवार? (Drought In Maharashtra)
राज्यात पाण्याची स्थिती गंभीर असून, सध्याच्या घडीला १९ जिल्ह्यात दुष्काळाचा परिणाम जाणवत आहे. राज्यातील ७३ टक्के भाग दुष्काळाच्या छायेत आहे. १५०० महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातल्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली. संभाजीनगरमध्ये १५६१ टँकरची मागणी आहे. पण पाणीपुरवठा कमी आहे. अशी सविस्तर माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या सरकारकडे ‘या’ मागण्या
तसेच पीककर्जाचे पुर्व गठन, कर्जवसुलीला स्थगिती द्यावी. शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, त्यावर विमा कंपनी टाळाटाळ करत आहे. त्यात केंद्राने हस्तक्षेप करावा. विजपुरवठा खंडित करु नये, रोजगार हमी कामाचे निकष शिथिल करावेत. शैक्षणिक शुल्क माफ करावे, चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मागण्याही दुष्काळग्रस्त (Drought) भागातील शेतकऱ्यांच्या आहेत, त्या मागण्या आम्ही सरकारकडे करत आहोत,” असेही शरद पवार म्हणाले आहे.
प्रचार संपलाय, मदतीची मागणी
प्रचाराच्या काळात दुष्काळी उपाययोजना करण्यात अडचणी होत्या. निवडणूक आयोगाचे तसे निर्देश होते. मात्र आता प्रचार संपलाय, आता मदत करावी, अशी मागणीही शरद पवार यांनी यावेळी केली आहे. तसेच पुण्यातील कार दुर्घटना हा एक अपघात आहे. त्याला इतके राजकीय महत्व आहे, असे मला वाटत नाही,” असेही ते यावेळी म्हणाले.