कोरोनाकाळात तरुणाने सुरु केला मधुमक्षिका पालन उद्योग, तयार केला स्वतःचा मधाचा ब्रँड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२० सालापासून कोरोनाने अनेक व्यवसाय उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी शहरे सोडून आपला गावच बरा गाड्या ! असे म्हणत गावाकडची वाट धरली. असे अनेक तरुण आहेत ज्यांनी कोरोनाकाळात शेतीमध्ये नवनवीन यशस्वी प्रयोग केले. तर काही तरुणांनी शेती पूरक व्यवसाय सुरु केले. कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाने देखील कोरोनाकाळात शेतीपूरक मधुमक्षिका पालन उद्योग सुरु केला आहे. आजच्या लेखात जाणून घेऊया या तरुण व्यवसायिकाबद्दल…

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग या गावातील विवेक वसंत पाटील (३२) हे यांनी मेकॅनिकल डिप्लोमा केला आहे. त्यांचे स्वात:चे वर्कशॉप देखील आहे. गावातच त्यांची चार एकर काजूची बाग आहे. त्यांची फळबाग असल्यामुळे त्याच्याशिवाय इतर कोणते पीक या शेतात घेता येत नव्हते. अशावेळी मधुमक्षिका पालन हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो ही बाब उमगल्यानंतर त्यांनी आपल्या काजूच्या बागेत मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरु करायचे ठरवले.

खादी ग्राम उद्योग कडून प्रशिक्षण

खादी ग्राम उद्योग कडून दिल्या जाणाऱ्या प्रक्षिणमध्ये त्यांनी सहभाग घेतला. १० दिवस दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये १६,३०० रुपयांची रक्कम भरून मधुमक्षिका पालनाच्या १० पेट्या त्यांना मिळाल्या. यासोबतच या उद्योगाकरिता लागणारे इतर साहित्य देखील मिळाले.

‘मकरंद’ नावाचा स्वतःचा मधाचा ब्रँड

मागील ७-८ महिन्यांपासून विवेक यांना या व्यवसायातून ४० किलो शुद्ध मध मिळाल्याचे त्यांनी ‘हॅलो कृषी’ सोबत बोलताना सांगितले. एवढेच नाही तर हा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी जेवढे पैसे या व्यवसायात गुंतवले होते. केवळ ७-८ महिन्यात त्याच्या दुप्पट पैसे मिळाल्याचे देखील विवेक यांनी सांगितले. शिवाय त्यांच्या शेतात तयार झालेला शुद्ध मध गावात आणि पुणे, मुबई सारख्या शहरांमध्ये देखील पाठवला जात असल्याची त्यांनी माहिती दिली. विवेक पाटील यांनी ‘मकरंद’ नावाचा स्वतःचा मधाचा ब्रँड तयार केला असून. त्याचे रजिस्ट्रेशन करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्यवसायातील फायदे

या व्यवसायातील फायद्याबद्दल बोलताना विवेक यांनी सांगितले की,

–तुमच्या शेतात हा व्यवसाय सुरु केल्याने शेतीसाठी त्याचा चांगला फायदा होतो. कारण मधमाशा ह्या उत्तम परागीकरण करत असतात. त्यामुळे फळबाग किंवा शेतीचे पीक चांगले येते.
–शुद्ध मध मिळतो.
–याकरिता दैनंदिन देखरेदीसाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही.
–मधाच्या पोळ्यापासून मेण मिळते.
–‘पोलन’ मिळते ज्याचा वापर रोगप्रतिआकारक शक्ती वाढवणारे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्याची किंमत मधापेक्षा देखील जास्त असते.

या व्यवसायातील रिस्क

या व्यवसायातील रिस्क कोणती आहे? याबाबत बोलायचे झाल्यास मधमाशा पावसाळ्यामध्ये मध तयार करीत नाहीत. पावसाळ्याच्या ४ महिन्यात त्या साठवलेल्या मधावर उरनिर्वाह करीत असतात. त्यामुळे या चार महिन्यात उत्पादन मिळत नाही. मात्र जर तुम्हाला या चार महिन्यात उत्पादन घ्यायचे असल्यास तुम्हाला या मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर करावे लागते. जिथे पाऊस कमी आहे किंवा अत्यल्प आहे. हा या व्यवसायातला रिस्क फॅक्टर असल्याचे विवेक यांनी सांगितले.

 

Leave a Comment

error: Content is protected !!