E-NAM : ई-नामच्या माध्यमातून यावर्षी 1137 कोटींच्या शेतमालाची विक्री!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आर्थिक वर्षात ई-नामच्या (E-NAM) माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत आंतरराज्यीय व्यापारात 161 टक्क्यांनी वाढ झाली असून, तो 1137 कोटींपर्यंत पोहचला आहे. ई-नाम प्रणालीमुळे अनेक राज्यांमधील शेतमालाच्या विक्रीमध्ये वाढ झाली असून, आपला माल बाजार समित्यांपर्यंत नेण्याचा खर्च वाचवण्यात शेतकऱ्यांना मदत झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ (E-NAM) होण्यास मदत झाली आहे.

सर्वाधिक विक्री करणारे राज्य (E-NAM 1137 Crore Worth Of Agri Products)

इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार (E-NAM) या प्रणालीच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात शेतमालाची विक्री केली आहे. यात प्रामुख्याने आतापर्यत आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीर या 11 राज्यांमध्ये शेतमालाची सर्वाधिक विक्री करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून धान, मका, कापूस, फ्लावर, कांदा, टोमॅटो आणि अन्य शेतमालाची विक्री करण्यात आली आहे.

वाहतूक खर्चात बचत

ई-नाम प्रणालीद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या मालाची माहिती पोर्टलवर भरल्यास, खरेदीदार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतमालाची खरेदी करत आहे. तसेच खरेदीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मालाची रक्कम जमा केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात बचत होऊन, त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे. ई-नाम प्रणालीच्या माध्यमातून त्या-त्या राज्य सरकारकडून अधिसूचित करण्यात आलेल्या 209 कृषी, फळे व भाजीपाला उत्पादनांची खरेदी-विक्री होत आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.

17.68 लाख शेतकऱ्यांचा सहभाग

सद्यस्थितीमध्ये देशातील 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1361 बाजार समित्या या ई-नामच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत. याशिवाय 17.68 लाख शेतकरी, 3320 शेतकरी उत्पादक संघटना, 0.25 दशलक्ष व्यापारी आणि सुमारे 0.11 दशलक्ष कमिशन एजंट हे या प्रणालीच्या माध्यमातून जोडले गेले आहे. दरम्यान, तामिळनाडू (157), राजस्थान (145), गुजरात (144), महाराष्ट्र (133), उत्तरप्रदेश (125), आणि हरियाणा (108) या राज्यांमध्ये सर्वाधिक बाजार समित्या या प्रणालीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत.

error: Content is protected !!