हॅलो कृषी ऑनलाईन: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan) एक महत्त्वाची बातमी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा (Agriculture Schemes) लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत (Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan) जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमा अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रक्कम रुपये 130.05 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे.
सदर योजनेअंतर्गत (Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan) ड्रॅगन फ्रुट (Dragon fruit Subsidy), सुट्टी फुले, मसाला पिके, फळबागा पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरीण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी कव्हर, मधुमक्षिका वसाहत आणि मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर 20 एचपी पर्यंत, पॉवर टिलर 8 एचपी पेक्षा जास्त आणि कमी, पिक संरक्षण उपकरणे यासाठी अनुदान मिळणार आहे. यासोबतच या योजनेत पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थायी / फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर इत्यादी घटकांचा देखील समावेश आहे.
या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या (Farmers) नावे स्वतःची शेत जमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. जिल्हयातील अनुसुचित जाती प्रवर्गातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावेत.