पावसाची उघडीप; पिकातील ओलावा कसा टिकवाल? वाचा तज्ञांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी ऊन देखील आहे. अशा स्थितीत पिकांमधील ओलावा टिकून राहणे महत्वाचे आहे. पावसात खंड पडलेला असताना पीकामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील उपाययोजना सुचविलेल्या आहेत.

बऱ्याचवेळा सरासरी एवढा पाऊस झाला तरी नेमका पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेत पावसाचे १ ते २ खंड आढळून येतात. हे पावसाचे खंड बऱ्याचवेळा जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आढळून येतात. हा पावसाचा अनियमितपणा किंवा खंड पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेत, पिकांच्या मध्यावस्थेत आणि पक्वतेच्या काळातसुद्धा येऊ शकतो आणि त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

हे करा उपाय

1)या काळात विहीर किंवा शेततळ्यात पाणी असल्यास पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
2)पिकांच्या अवस्थेनुसार हलक्‍या कोळपण्या कराव्यात, पिकांना मातीची भर द्यावी. कोळपणीमुळे भेगा बुजविल्या जातात. याद्वारे ओलावा साठवून ठेवण्यात मदत होते.
3)बाष्पीभवनामुळे जमिनीतील सुमारे ७० टक्के ओल उडून जाते. जमिनीतील ओल टिकवून ठेवण्यासाठी शेतातील निरोपयोगी काडी, कचरा, धसकटे, आणि गवताचा वापर पिकाच्या दोन ओळीमध्ये करावा.आच्छादनामुळे २५ ते ३० मीमी ओलाव्याची बचत होते. उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होते.
4)जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पानांचे तापमान वाढते. पिके कोमेजतात. पानाच्या पृष्ठभागावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. पानातील अण्णांश तयार करण्याची क्रिया मंदावते. अशावेळी दोन टक्के युरियाची फवारणी केल्यास पिकाच्या पानांतील क्रिया गतिमान होण्यास मदत होते आणि पिके जमिनीतील ओलावा शोषणास सुरुवात करतात.
5)उष्णतेमुळे पानाच्या पृष्ठभागावरुन होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी केओलीन किंवा खडू पावडरचा ८ टक्के फवारा पानांवर दिल्यास सूर्यप्रकाश पानावरून परावर्तित होऊन पिकाच्या अंतरंगातून होणारी पाण्याची वाफ कमी करण्यास मदत होते.
6) पिकाच्या फुलोरा ते दाणे भरण्याच्या वेळी एकास तीन प्रमाणात रोपांची संख्या कमी करावी. पिकाची खालील पाने कमी करावीत आणि वरील चार ते पाच पाने ठेवावीत त्यामुळे पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होते.

Leave a Comment

error: Content is protected !!