Farmer Accident Insurance : शेतकऱ्यांसाठीच्या अपघात विम्यापोटी 23 कोटी निधी मंजूर; वाचा जीआर..!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात (Farmer Accident Insurance) सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अपघात विम्यापोटी एकूण 23.37 कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता अपघाती निधन झालेल्या किंवा अपघाती अपंगत्व आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer Accident Insurance) कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याआधी 48 कोटींचा निधी वितरित (Farmer Accident Insurance For Farmers)

चालू फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेअंतर्गत एकूण 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास राज्य सरकारकडून याआधीच मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबत शासन निर्णय देखील सरकारकडून जारी करण्यात आला होता. राज्यातील प्रामुख्याने 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 आणि 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील एकूण 2453 शेतकरी दावे निकाली काढण्यात आले. त्यापोटी ही 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास राज्य सरकारने पहिल्या आठवड्यात मान्यता दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा 23.37 कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठीच्या अपघात विम्यापोटी 48 कोटी मंजूर; वाचा जीआर..! (https://hellokrushi.com/farmer-accident-insurance-48-crore-sanctioned/)

कोणाला मिळते मदत?

शेती करणे तितकेसे सोपे काम नाहीये. कधी वन्य प्राणी तर कधी नैसर्गिक संकटांच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात काम करावे लागते. ज्यामुळे अंगावर वीज पडणे, महापूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अपघात होतात. याशिवाय शेतामध्ये काम करताना सर्पदंश, विंचूदंश यामुळे देखील शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. तर शेती पंपासाठी विजेशी संबंध येत असल्याने अचानक विजेचा शॉक बसणे यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागतात. शेती कामानिमित्त किंवा अन्यही वेळी कुठे बाहेर गेल्यास रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात झाल्यास कधी-कधी शेतकऱ्याचा मृत्यू होतो. या आणि अन्य सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबांना सरकारकडून सानुग्रह अनुदान दिले जाते.

काय आहे ‘ही’ योजना?

वरील सर्व परिस्थितींमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपंगत्व तर कधी कधी मृत्यू देखील ओढवतो. अशावेळी संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. कारण घरातील कर्ता पुरुष नसल्याने, त्या शेतकरी कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत व्हावी. या हेतूने राज्य सरकारकडून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविली जाते.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर – (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402201610242301.pdf)

error: Content is protected !!