प्रेमाने पाळलेल्या रेड्यानेच घेतला शेतकऱ्याचा जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्याने पाळलेल्या रेड्यानेच शेतकऱ्यावर हल्ला करून जीव घेतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ही घटना बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली आहे. धर्मराज पांडुरंग साठे (वय ५५) असे त्या रेड्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी धर्मराज साठे यांनी या रेड्याला मोठ्या कष्टाने जपले होते. म्हैस रेतनासाठी म्हणून त्यांनी हा रेडा पाळला होता. त्यामुळे त्याच्या खुराकासह सर्व ती काळजी ते घ्यायचे. अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांनी त्याचा सांभाळ केला होता.

अचानक रेडा सैरभैर झाला

दोन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे सावळेश्‍वर रस्त्यावर उसाच्या बाजूला बांधावर ते रेड्याला चारत होते. पण अचानकपणे हा रेडा सैरभैर झाला आणि थेट त्याने साठे यांच्यावरच हल्ला सुरू केला. सुमारे तासभर हा रेडा साठे यांना तुडवत होता. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाने त्या वेळी त्यांची सुटका करण्यासाठी जवळपास लोकही नव्हते. पण ज्यावेळी लोक आले, तोवर वेळ निघून गेली होती.

लाखाला मागितला, पण विकला नाही

गेल्या महिन्यातच त्याने साठे यांच्यावर हल्ला केला होता. त्याच वेळी काही गावकऱ्यांनी या रेड्याला विकण्याचा सल्ला दिला. अगदी पंधरवड्यापूर्वी एका ग्राहकाने हा रेडा तब्बल एक लाख रुपयांना साठे यांना मागितलाही होता. मात्र साठे यांनी प्रेमापोटी त्याला विकले नाही. पण शेवटी या रेड्यावरील अतिप्रेमच शेतकऱ्यासाठी जीवघेणे ठरले.

Leave a Comment

error: Content is protected !!