कांद्याला आले कोंब आता तरी सरकार लक्ष देणार का ? शेतकऱ्याने कांद्यावर रेखाटली मोदींची चित्रे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी बनला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला उत्पादन खर्चही निघेना अशी स्थिती असल्यामुळे इथून पुढे कांदा लागवड करायची की नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच नाशिकमधल्या एका शेतकऱ्याने सरकारचे कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कांद्यावर कलाकुसर केली आहे. या शेतकऱ्याने २० कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रे रेखाटली आहेत. तर एका कांद्यावर दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांचे चित्र रेखाटले आहे. त्यांची ही कलाकुसर सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

कांद्याला कोंब फुटले तरी सरकारला जाग येईना

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, किरण दादाजी मोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते एक व्यंगचित्रकार आहेत. कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं कलाकार शेतकऱ्यानं 20 कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेगवेगळ्या मुद्रा रेखाटल्या आहेत. तर एका कांद्यावर दिवंगत शरद जोशी यांची मुद्रा रेखाटली आहे. सध्या कांद्याला कोंब फुटले आहेत. तरी देखील सरकारला जाग येईना सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही कलाकुसर केली असून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी शरद जोशी यांच्या जयंतीदिवशी देखील कांद्यावर त्यांची कलाकृती काढली होती. असे मोरे यांनी सांगितले.

शेतकऱ्याने जगायचं कसं ?

पुढे माहिती देताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचं प्रेम आहे. मात्र, त्यांनी गरीब शेतकऱ्यांकडं लक्ष द्याव. शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी ही कलाकृती केल्याचे मोरे म्हणाले. मला एक चित्र काढण्यासाठी अर्धा दिवस लागल्याचे मोरेंनी सांगितले. आज कांदा टिकला आहे पण भाव टिकाला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यानं जगायचं कसं? असा प्रश्न निर्माण झाल्याचे मोरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांची कांद्यावर चित्र रेखाटताना ब्रशचा वापर केला असल्याचे मोरे म्हणाले.

error: Content is protected !!