Farmer’s Day : राज्यामध्ये 30 ऑगस्ट हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पदश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील (Doctor Vitthalrao Vikhe Patil) यांच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जाणार आहे. याबाबत शासनाने एक जीआर देखील जारी केला आहे. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कार्य केले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यामुळे 30 ऑगस्ट 2023 या नारळी पौर्णिमेच्या दिवशी शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 30 ऑगस्ट रोजी विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म झाला होता त्यामुळे त्या दिवशी शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे.
कोण आहेत विठ्ठलराव विखे पाटील
सहकार क्षेत्रामधील तज्ञ डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हे साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक होते. इंग्रज सरकारने आणलेल्या तुकडे बंदी आणि तुकडे विधायकामुळे सावकारांच्या घशात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी विठ्ठलराव विखे पाटील यांचे मोठे योगदान आहे. यासाठी त्यांनी हजारो शेतकऱ्यांचे पुढे भाषण देऊन त्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. त्यामुळे त्यांची एक चांगलीच ओळख बनली. (Farmer’s Day)
विखे पाटील यांना मिळाला हा पुरस्कार
विखे पाटील यांनी सहकार, औद्योगिक, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल 1961 मध्ये भारत सरकारने त्यांना पदश्री हा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. विखे पाटील यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. याच गावांमध्ये त्यांनी 1923 मधील लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी स्थापन केली. सहकारी तत्त्वावर स्थापन झालेली ही आशियातील पहिली पतपेढी मानली जाते.
त्याचबरोबर त्यांनी नंतर इतर गावांमध्ये देखील सहकारी पतपेढी स्थापन केल्या आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत उपलब्ध करून दिली त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचे मोठे योगदान मानले जाते. याच गोष्टीचा विचार करून आता 30 ऑगस्ट रोजी त्यांच्या जन्मदिनी शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
विखे पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान
दरम्यान, विखे पाटील यांनी कृषी क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठे काम केले आहे. समाजातील शेवटच्या स्तरावरील मुलापर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालय यांची देखील त्यांनी स्थापना केली. त्याचबरोबर त्यांनी आर्थिक शाळांना आर्थिक सहकार्य देखील केले आहे.