हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा शेतातील पिके चांगली येऊ लागली की, वन्य प्राण्यांकडून नुकसान केल्याच्या घटना आपण वारंवार ऐकत आणि पाहत असतो. जर शेताचे क्षेत्रफळ कमी असेल तर पीक संरक्षणासाठी तारेचे कुंपण केले जाते. मात्र शेतीचे क्षेत्र मोठे असल्यास तारेचे कुंपण करण्यास मोठा खर्च येतो. मात्र एका शेतकऱ्याने जुगाड करीत पीक संरक्षणाची जैविक पद्धत शोधून काढली आहे. विशेष म्हणजे हि पद्धत तितकीच प्रभावी देखील ठरली आहे. एका शेतकऱ्याने वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी ५० एकर शेताभोवती निवडुंगाचे कुंपण केले आहे. त्यामुळे शेतात हरीण, रानडुक्कर, नीलगाय असे प्राणी येऊन शेताचे नुकसान करणार नाहीत.
पीक संरक्षणासाठी जैविक कुंपण
अकोला जिल्ह्यातील येथील खापरवाडी बुद्रुक इथे राहणाऱ्या जगन प्रल्हाद बगाडे यांची स्वतःची वीस एकर जमीन आहे. तर त्यांनी 50 एकर जमीन कसण्यासाठी घेतली आहे. जगन यांनी खूप विचार आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनाही कल्पना आली की निवडुंगाचं कुंपण उपयोगी ठरू शकते. कोणताही प्राणी हे खात नाही आणि ती क्षण काट्यांमुळे वन्यजीव त्याच्या जवळ फिरकतही नाहीत.
शेताभोवती तटबंदी
पहिल्या टप्प्यात जगन यांनी मजुरांच्या मदतीने छोट्या फांद्या लावल्या कोणतेही व्यवस्थापन न करता ही झाड मोठ्या प्रमाणात वाढली शेताभोवती जणू एक तटबंदी तयार झाली. आज या निवडुंगाचे 50 एकराला कुंपण तयार झाले असून झाडं दहा ते बारा फूट उंच वाढली आहेत. प्रत्येक झाडांमधील अंतर दोन फुटाचे आहे. झाडाचा बुंधा मजबूत झाला असून कोणताही प्राणी शेतात घुसण्यास धजावत नाही. त्यामुळे पिकाचे संरक्षणाचे काम आता बंद झाले आहे. सहा ते सात वर्षांपूर्वी 30 एकरासाठी केवळ 15000 चा खर्च आला होता. दोडका, कारले, वाल आदी पिकांची कुंपणावर लागवड करण्यात आली आहे.
जैविक कुंपणाचे फायदे
–वन्य प्राण्यांचा होणारा त्रास थांबला
–मोठ्या प्रमाणात मृदा संवर्धन झाले.
–थंडीच्या लाटेत पिकांचे नुकसान टळले.
— पिकांवर होणारा कीटकांचा त्रास कमी झाला
— निवडुंग उभे वाढत असल्याने ते अधिक फायदेशीर ठरले आहे.
–या कुंपणावर बेलवर्गीय पिके घेऊन आर्थिक फायदाही शेतकऱ्याला होत आहे.