Farmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलन 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; वाचा नेमकं काय घडलंय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेले पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. 13 फेब्रुवारीपासून मागील दहा दिवसांमध्ये जवळपास 5 शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला. यात एका तरुण शेतकऱ्याला देखील आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. ज्यामुळे आंदोलनात असे कोवळे जीव जात असतील. तर आर्थिक सुबत्ता काय कामाची? असे म्हणत शेतकरी संघटनांनी 29 फेब्रुवारीपर्यंत आंदोलन थांबवले आहे. मात्र, या पाच दिवसांच्या कालावधीत शेतकरी संघटनांनी एक योजना बनवली असून, शेतकरी संघटना शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर शांतीपूर्ण मार्गाने सरकारचा विरोध (Farmers Protest) करतच राहणार असल्याचे संघटनांनी जाहीर केले आहे.

आज निघणार कँडल मार्च (Farmers Protest In New Delhi)

आज (ता.24) संध्याकाळच्या सुमारास शेतकरी संघटनांकडून (Farmers Protest) शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर कँडल मार्च काढला जाणार आहे. 21 वर्षीय तरुण शेतकरी शुभकरण सिंह आणि अन्य चार शहिद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कँडल मार्च शेतकरी संघटनांकडून आज देशभरात आयोजित केला जाणार आहे. तसेच त्यानंतर दिल्लीत उपस्थित सर्व शेतकरी व शेतकरी संघटना हे शनिवारी रात्री उशिरा चर्चेसाठी एकत्र जमणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये शेती क्षेत्रातील तज्ज्ञांना देखील बोलवले जाणार आहे.

राजकीय नेत्यांचे 20 फुटी पुतळे जाळणार

याशिवाय 26 फेब्रुवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसहित उद्योजक घराण्यांचे जवळपास 20 फूट उंच पुतळे जाळले जाणार आहे. 27 व 28 फेब्रुवारी रोजी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या संघटना पुन्हा एकदा एकत्रित चर्चा करतील. आणि त्यानंतर पुन्हा 29 फेब्रुवारी सक्रिय पद्धतीने आंदोलन सुरु केले होईल, अशी माहिती शेतकरी संघटनांनी जाहीर केली आहे.

अशी आहे शेतकरी संघटनांची योजना

  • 24 फेब्रुवारी – 21 वर्षीय तरुण शेतकरी शुभकरण सिंह आणि अन्य चार शहिद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन.
  • 25 फेब्रुवारी – शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर उपस्थित शेतकऱ्यांना जागतिक व्यापार संघटनेच्या धोरणांची जाणीव करून दिली जाईल.
  • 26 फेब्रुवारी – देशभरातील गावा-गावांमध्ये जागतिक व्यापार संघटनेचे पुतळे जाळले जातील. दुपारी 3 वाजेनंतर दोन्ही सीमेवर पुतळे जाळण्यात येणार आहेत.
  • 27 व 28 फेब्रुवारी – संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या संघटना एकत्रित बैठक घेतील.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

दरम्यान, शुक्रवारी (ता.२३) सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करावा. अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र आणि हरियाणा सरकारने शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून काय सुनावणी होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!