हॅलो कृषी ऑनलाईन: देशभरातली शेतकरी (Farmers Success Story) राजा मेहनत आणि इच्छा शक्तीच्या जोरावर नापीक जमिनीतूनही पीक काढून दाखवू शकतो. त्यात आपल्या रांगडा मराठी शेतकर्याचा (Maharashtrian Farmer) कोणी नाद केला तर काही बदला घेण्याची तऱ्हा काही वेगळीच असते. असचं काहीतरी घडलय जालना (Jalana) जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबी गावच्या सतीश तौर या शेतकऱ्यासोबत (Farmers Success Story).
महाराष्ट्रात गव्हाची काढणी (Wheat Harvester) करण्यासाठी पंजाब, हरियाणातून मोठ्या प्रमाणावर मळणी यंत्र (हार्वेस्टर) महाराष्ट्रात येतात. पिकांच्या काढणीसाठी त्यांची मनमानी आणि दर पाहून शेतकर्यांच्या नाकी नऊ येतात. पण य़ाच पंजाबी लोकांच्या नाकावर टिच्चून मराठी शेतकर्याने तब्बल 32 हार्वेस्टर (Harvesters) घेऊन दाखवले आहेत (Farmers Success Story) .
साधारण 2007-08 साली पारंपारिक पद्धतीने शेती करून शेतीमधून जास्त उत्पन्न (Agriculture yield) निघत नसल्यामुळे सतीश यांनी एक मळणी यंत्र खरेदी केले. या मळणी यंत्रावर (Harvester Machine) त्यांनी अनेक वर्षे काम केले. पण कालांतराने गोदावरी पट्ट्यामध्ये पाण्याची उपलब्धता निर्माण झाल्याने या पट्ट्यामध्ये उसाचे आणि गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढू लागले होते.
सतीश तौर (Satish Taur) यांनी त्यावर्षी स्वत:च्या शेतात मोठ्या प्रमाणावर गहू पेरला (Wheat Crop) होता. पण त्यांना या गव्हाच्या मळणीसाठी मोठ्या हार्वेस्टरची गरज होती. पण त्यावेळी पंजाब(Punjab), हरियाणामधील यंत्रे महाराष्ट्रात येत असायचे. एका गावात एकच यंत्र (Crop Harvester) असल्यामुळे त्या यंत्रामागे अनेक शेतकर्यांनी नंबर लावलेले असायचे.
दोन ते तीन दिवस नंबर लावल्यानंतर हार्वेस्टर शेतात यायचे अशी स्थिती होती. सतीश यांनी दोन-तीन दिवस वाट पाहूनही नंबर लागला नाही, तेव्हा त्यांनी हार्वेस्टर मालकाच्या हातावर पैसे ठेवले आणि शेतात गहू काढायला येण्यास विनंती केली. हे पाहून पंजाबी मालक त्यांच्यावर रागावला. “तू मशीनचा मालक आहेस का?” असं सतीश यांना म्हणत त्यांचा अपमान केला. त्यावेळी सतीश यांना हा अपमान सहन झाला नाही. “आत्ता मी मशीनचा मालक (Harvester Machine Owner) नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच मी मालक असेल” असं आवाहन सतीश यांनी पंजाबी मशीन मालकाला दिले.
या घटनेनंतर त्यांनी काही दिवसांत म्हणजे 2009 च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पंजाब मधून एक मळणी यंत्र खरेदी केले आणि व्यवसाय सुरू केला. वाशिम येथील रिसोड तालुक्यात मशीन आल्यानंतर त्यांनी घरी न आणता तिथूनच कामाला सुरूवात केली. पुढे त्यांनी त्याच वर्षी दुसरे मशीन घेतले. त्यांचे काम शेतकर्यांना आवडू लागल्यामुळे शेतकरी यांच्या यंत्राने मळणी करण्यासाठी रांगा लावत होते. हा व्यवसाय वाढीस लागला आणि त्यांनी मागच्या जवळपास 15 वर्षामध्ये 32 मळणी यंत्रे खरेदी केले (Farmers Success Story).
एकाच मशीनमधून 8 ते 9 पिकांची काढणी
सतीश यांच्याकडे असलेल्या मळणी यंत्राद्वारे सोयाबीन, मका, गहू, मूग, उडीद, करडई, सूर्यफूल, तूर, हरभरा आणि इतर पिकांचीही काढणी केली जाते. शेती करत असताना येणाऱ्या मजूरांच्या समस्येवर यामुळे मोठा आधार झाला आहे. त्याचबरोबर कमी वेळेत आणि कमी पैशांमध्ये या पिकांची काढणी होत असल्यामुळे शेतकर्यांना फायदा होत आहे.
हंगामामध्ये 70 ते 80 लोकांना रोजगार
मळणी यंत्रे हंगामानुसार चालत असल्यामुळे एका मशीनसाठी त्यांनी तीन कामगारांची गरज असते. त्यामुळे जवळपास 70 ते 80 लोकांना या व्यवसायातून त्यांनी रोजगार दिला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मूग, उडीद आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये सोयाबीनची काढणी केली जाते.
तीन राज्यांमध्ये काम
सतीश यांच्याकडे या घडीला 32 मळणी यंत्रे असून ते महाराष्ट्र आणि विदर्भात काम करतात. त्याचबरोबर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यातही त्यांचे यंत्र कामासाठी जात आहेत. ते कमी दरामध्ये शेतकर्यांना चांगली सेवा देत असल्यामुळे शेतकर्यांचा त्यांच्या कामावर विश्वास असल्याचं ते सांगतात.
शेतकरी किंवा मराठी माणूस धंदा करू शकत नाही असे टोमणे अनेकदा मारले जातात. पण एक हाडाचा शेतकरी पंजाबी लोकांच्या नाकावर टिच्चून आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकतो हे सतीश तौर यांनी दाखवून दिले आहे. सतीश यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.