Honey Festival: देशातील पहिल्या ‘मध महोत्सवाचा’ मान महाराष्ट्राला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Honey Festival: मधमाशीपालन उद्योगाची व्याप्ती वाढून, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मधमाशा पालनाबाबत लोकांना माहिती मिळावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ (Honey Festival) महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारीला होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

मुंबईत होणाऱ्या ‘मध महोत्सव’ (Honey Festival) कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

फोर्ट येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामीण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सहायक अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.

यावेळी साठे म्हणाले की, मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाशी जोडलेला आहे. देशातील पहिले मध संचालनालय १९४६ मध्ये महाबळेश्वर येथे स्थापन करण्यात आले. महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन केंद्र शासनाने मध संचालनालय सुरु केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने ‘मध केंद्र योजना’ तसेच ‘मधाचे गाव’ या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे.

मधमाशापालनातील उत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती व विक्रीसाठी ‘मध महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यात मधाबरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात येणारे इतर उत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान 20 स्टॉल मध महोत्सवात (Honey Festival) उभारण्यात येणार आहेत.

दोन दिवसांच्या या ‘मध महोत्सवात’ (Honey Festival) मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

आरोग्यासाठी मधाचा उपयोग, मध निर्मिती, या विषयात काम करणारे अनेक तज्ज्ञ आणि पहिल्यांदाच न बघितलेले, न अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर मधपाळ, शेतकरी यांच्यासाठी मधपालन कसे करायचे याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.

शेतकरी, मधमाशी पालक आणि मध प्रेमींना मध महोत्सव (Honey Festival) म्हणजे आगळे वेगळे जग अनुभवण्याची संधी असणार आहे हे नक्की

error: Content is protected !!